मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजपला नुसताच फटका बसणार नाही तर त्यांचा सुपडा साफ होईल. महाराष्ट्रातील निवडणुकांचे निकाल भाजपच्या अंताची सुरुवात ठरेल, अशी टीका जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला. विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरे भेटीदरम्यान चर्चा झाली. याविषयीची माहिती प्रसारमाध्यमांना देताना मलिक यांनी या निवडणुकीत उद्धव ठाकरे महत्त्वाची भूमिका बजावणार असून कुणालाही काळजी करण्याची गरज नाही. विधानसभेचे जे निकाल येतील, त्याच्यावरून सबंध देशातील राजकीय परिस्थिती ढवळून निघणार आहे, असा अंदाज वर्तविला. महाविकास आघाडीला आपला पूर्ण पाठिंबा असून आगामी निवडणुकीत आघाडीचा प्रचारही करणार असल्याचे ते म्हणाले.