पीटीआय, श्रीनगर
जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २६ जागांसाठी बुधवारी मतदान होईल. एकूण २३९ उमेदवार रिंगणात असून, २५ लाख मतदार हक्क बजावतील. काश्मीर खोऱ्यातील तीन तर जम्मूतील तीन अशा सहा जिल्ह्यांत हे मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यासाठी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. एकूण ३५०२ मतदान केंद्रे असून आहेत. दुसऱ्या टप्प्यात माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना, जम्मू व काश्मीर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कारा हे प्रमुख उमेदवार आहेत.

अब्दुल्ला हे गांदेरबल तसेच बडगाव या दोन मतदारसंघांतून रिंगणात आहेत. कारागृहात असलेला फुटीरतावादी सर्जन अहमद वॅघे ऊर्फ बरकती बीरवाहमधून रिंगणात आहे. पहिल्या टप्प्यात १८ सप्टेंबरला ६१.३८ टक्के मतदान झाले होते.