पालघर लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील तिढा सुटला नसल्याने उमेदवारीला विलंब होत आहे. मात्र स्वतंत्र पक्ष असणार्या बहुजन विकास आघाडीने आपला उमदेवार अद्याप जाहीर केला नसल्याने तर्कवितर्क लढविले जात आहे. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा खासदार आहे. असे असले तरी महायुतीच्या चर्चेत भाजपानेही या जागेवर दावा सांगितला आहे. हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला तर हितेंद्र ठाकूर यांचा पक्ष नेमकी कोणती भूमिका घेईल याविषयी उत्सुकता आहे. त्यातच हा मतदारसंघ शिवसेनेला मिळाला तर उमेदवार उभा करायचा अशी रणनीती ठाकूर यांच्या गोटात आखली गेल्याचे समजते.
पालघर लोकसभा मतदारसंघ अत्यंत चुरशीचा बनलेला आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत अपेक्षित आहे. मात्र अद्याप महायुती आणि बहुजन विकास आघाडीने आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (ठाकरे) गटाच्या भारती कामडी यांची उमेदवारी जाहीर होऊन त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा यांच्यात या जागेबाबत तिढा सुटला नसल्याने महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. पण हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी हा स्वतंत्र पक्ष असून त्यांनी उमेदवार का जाहीर केला नाही याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहे. शनिवारी तर बविआने उमेदवाराची घोषणा करण्याची तयारी केली होती. ६ उमेदवारांच्या मुलाखती देखील झाल्या होत्या. मात्र त्यांनी उमेदवारी जाहीर केली नाही.
महायुतीच्या निर्णयानंतर बविआची उमेदवारी?
पालघर मधील विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिंदे गटात आहे. त्यांनाच महायुतीतर्फे उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. परंतु भाजपाचा पालघर लोकसभा मतदार संघावर प्रबळ दावा आहे. गावित यांनी कमळावर निवडणूक लढविण्याची मागणी आहे. गावित शिवसेनच्या धनुष्यावर लढले तर पराभूत होतील, असे भाजपाचे नेते खाजगीत सांगतात. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनुष्य या चिन्हावरच आपला उमेदवार हवा असल्याने या जागेचा तिढा कायम आहे. त्यामुळे राजेंद्र गावित कुठल्या चिन्हावर निवडणूक लढविणार याकडे बविआ लक्ष ठेवून आहे. गावित यांना शिवेसनेतर्फे उमेदवारी मिळाल्यास बविआ मोठ्या ताकदीने रिंगणात उतरणार. मात्र गावित यांना कमळावर उमेदवारी मिळाल्यास बविआ वेगळी रणनिती आखू शकते. त्यामुळेच बविआने आपल्या उमेदवारीचा निर्णय राखून ठेवल्याची चर्चा आहे.
पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांना याबाबत विचारले असता, त्यांनी या चर्चांना काही अर्थ नसल्याचे सांगितले. आमचा उमेदवार लवकरच जाहीर करू असे त्यांनी सांगितले.