पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आसाममधील ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट पक्षाचे नेते व ढिंग विधानसभेचे आमदार अमिनुल इस्लाम यांनी या हल्ल्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. या विधानानंतर इस्लाम यांच्यावर आसाम पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “प्रशासनाने एक व्हिडीओ पाहिला आहे, जिथे अमिनूल इस्लाम हे पाकिस्तान आणि हल्ल्यातील त्यांच्या सहभागाचे समर्थन करीत आहेत”. त्यानंतर आसाम पोलिसांनी इस्लाम यांच्यासह सहा जणांना अटक केली आहे. एआययूडीएफचे अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांनी पहलगाम हल्ल्यावरील इस्लाम यांच्या भूमिकेला पक्षापासून दूर केले आहे. “अमिनूल इस्लाम यांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. आपल्या सरकारसोबत उभे राहण्याची हीच वेळ आहे. दहशतवाद्यांचा कोणताही धर्म नसतो. हे दहशतवादी इस्लाम धर्माला बदनाम करीत आहेत,” असे ते यावेळी म्हणाले.

आमदार अमिनुल इस्लाम यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारचा हात असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. याआधी २०१९ ला पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामागेदेखील केंद्र सरकारचा हात होता, असे ते म्हणाले होते.

कोण आहेत अमिनूल इस्लाम?

इस्लाम यांनी त्यांचे वडील मौलाना खैरुल इस्लाम मुफ्ती यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात प्रवेश केला. ते आसामच्या नागाव जिल्ह्यातील एक प्रभावशाली अल्पसंख्याक नेते होते. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत इस्लाम यांनी नागाव जिल्ह्यातील ढिंग मतदारसंघातून अपक्ष उमेदवार महबूब मुक्तार यांच्यावर १.२ लाख मतांनी विजय मिळवला.

राजकीय डेटा संकलित आणि ट्रॅक करणाऱ्या गैर-नफा संस्थेच्या असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)नुसार इस्लाम यांच्यावर यापूर्वी फौजदारी संहितेच्या विविध कलमांशी संबंधित अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये देशद्रोह, धार्मिक भावना किंवा कोणत्याही वर्गाचा धर्म किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून जाणूनबुजून केलेले दुर्भावनापूर्ण कृत्य आणि धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषेच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे अशा अनेक आरोपांचा समावेश आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये इस्लाम यांनी म्हटले, “आसाममधील बंगाली भाषक मुस्लिम असलेल्या मिया समुदायाचे स्थानिक आसाममधील अहोमांपेक्षा जास्त संख्येत आहेत.” त्यामुळे त्यावेळी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

काही महिन्यांनंतर मे २०२० मध्ये कोविड-१९ साथीच्या काळात क्वारंटाइन केंद्रे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांबाबत दावा करणारा एक वादग्रस्त व्हिडीओ ऑनलाइन पोस्ट केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. आमदार आरोग्य कर्मचाऱ्यांविरुद्ध तसेच वैद्यकीय सुविधांविरुद्ध धार्मिक भेदभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने व्हाट्सअ‍ॅपद्वारे एका विशिष्ट समुदायात चुकीची माहिती पसरवत होते आणि सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध मोहीम राबवत होते, असे इस्लाम यांच्याविरुद्धच्या एफआयआरमध्ये म्हटले होते. त्यांच्या या कृतीमुळे धार्मिक संघर्ष उद्भवण्याची आणि कोविड रुग्ण उपचारांसाठी पुढे न येण्याची शक्यता होती, असे पोलिसांनी म्हटले होते. राज्य विधानसभेतही अमिनुल इस्लाम हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व राहिले आहेत. फेब्रुवारी २०१७ मध्ये सभागृहातून त्यांचे भाषण फेसबुकवर लाइव्ह केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले होते.

“पहलगाममध्ये हल्ल्यानंतर भाजपाकडून देशभरात एक नरेटिव्ह पसरवले जात आहे. अतिरेक्यांनी पर्यटकांना मारण्यापूर्वी त्यांचा धर्म विचारला आणि फक्त बिगरमुस्लिमांना गोळ्या घातल्या गेल्या. मात्र, हल्ल्यातून वाचलेल्या लोकांनी याला दुजोरा दिलेला नाही. अतिरेक्यांनी कुणालाही नाव न विचारता, काही अंतरावरून गोळ्या झाडल्याची बाब समोर आली आहे”, असा दावा आमदार अमिनूल इस्लाम यांनी केला होता.

“पहलगाममधील भयानक हल्ल्याच्या संदर्भात पाकिस्तानला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे समर्थन किंवा बचाव करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आसाम सहन करणार नाही”, असा इशारा गुरुवारी सरमा यांनी एक्सवर दिलेल्या पोस्टमधून केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले, “आतापर्यंत सोशल मीडियावर पाकिस्तानच्या हेतूला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन दिल्याबद्दल आसाम पोलिसांनी काही व्यक्तींना अटक केली आहे. त्यामध्ये हैलाकांडीमधील मोहम्मद जबीर हुसेन, सिल्चरमधील मोहम्मद ए. के. बहाउद्दीन, मोहम्मद जावेद मजुमदार, मोरीगाव येथील मोहम्मद महाहर मिया, नागावमधील मोहम्मद अमिनुल इस्लाम, शिवसागरमधील मोहम्मद साहिल अली यांचा समावेश आहे. तसेच या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही करीत असलेल्या कारवाईचा भाग म्हणून आणखी अटकसत्रे सुरू आहेत.”