पंजाबमधील काँग्रेसला लागलेली गळती काही थांबायला तयार नाही. माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष, पाच माजी कॅबिनेट मंत्री आणि काही आमदारांनी याआधीच भाजपाची कास धरली आहे. नुकतेच पंजाबचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते मनप्रीत सिंह बादल यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर स्वागत करत असताना माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एक सूचक ट्विट केले आहे. “मनप्रीत सिंह भाजपात सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन… अजून खूप नेते येणार आहेत.” पंजाबमध्ये अनेक वर्ष अकाली दलाच्या सावलीखाली राहणाऱ्या भाजपाने आता स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली असून काँग्रेसमधील अनेक अल्पसंतुष्टांना स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यामध्ये काँग्रेसची मात्र मोठी हानी होत आहे.

मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अमरिंदर सिंह यांनी पंजाब लोक काँग्रेस पक्षाला भाजपात विलीन केले. त्याआधी काँग्रेसने अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रीपदापासून दूर सारले होते. मुख्यमंत्री पद गेल्यानंतर अमरिंदर सिंह यानी स्वतःचा पक्ष काढला. अमरिंदर सिंह यांच्या भाजपा प्रवेशानंतर पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे (पीपीसीसी) माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. डिसेंबर २०२२ मध्ये अमरिंदर सिंह आणि जाखड यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला होता. त्यानंतर चारच दिवसांत १७ जणांना कोअर कमितीट स्थान देण्यात आले. ज्यामध्ये माजी मंत्री राणा गुरमीत सोढी आणि माजी आमदार फतेह जंग सिंह बाजवा यांचाही समावेश होता.

माजी मंत्री राणा गुरमीत सोढी यांनी डिसेंबर २०२१ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. तर २० फेब्रुवारी रोजी पंजाबची विधानसभा निवडणुकीच्या एका महिन्यानंतर माजी आमदार फतेह जंग सिंह बाजवा यांनी भाजपात प्रवेश केला होता. तर जून २०२२ मध्ये माजी मंत्री राज कुमार वर्का, बलबिर सिंह सिद्धू, गुरप्रित सिंह कांगर आणि सुंदर शाम अरोरा यांनी देखील काँग्रेसचा हात सोडून भाजपाची साथ निवडली होती.

राहुल गांधी यांनी नुकतेच भारत जोडो यात्रेनिमित्त पंजाबचा दौरा केला. यावेळी एवढ्या मोठ्या संख्येने एकापाठोपाठ एक दिग्गज नेते काँग्रेस सोडून भाजपमध्ये जात असल्याबाबत राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर गांधी म्हणाले, “भाजपामध्ये जो जातो, तो विशिष्ट प्रकारच्या दबावामुळे जातो, असा माझा अनुभव आहे. हा एक छुपा प्रकारचा दबाव असतो. सीबीआय, ईडी आणि इतर प्रकरणांच्या केसेसचा दबाव नेत्यांवर टाकला जातो. दबावाला बळी पडणारे लोक आता आमच्या पक्षात नाहीत, याचा मला आनंद वाटतो.” तसेच पक्षात नवे-जुने कार्यकर्ते एकत्र येऊन काम करत आहेत. त्यामुळे एक वेगळ्याप्रकारचा उत्साह मला पक्षात दिसत आहे, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे ज्यादिवशी (१७ जानेवारी) राहुल गांधी माध्यमांशी संवाद साधत होते. त्याच दिवशी मनप्रीत बादल यांनी आपला राजीनामा दिला होता.

पंजाबमध्ये अनेक वर्षांपासून भाजपसोबत युतीमध्ये असलेल्या अकाली दलाने मात्र भाजपच्या या इनकमिंगवर टीका केली आहे. अकाली दलाचे प्रवक्ते दलजित सिंह चीमा म्हणाले, “पंजाब भाजपा युनिटमध्ये काँग्रेस नेत्यांचा झपाट्याने होणारा समावेश पाहता माझी भाजपाच्या हायकमांडला विनंती आहे की, त्यांनी किमान तीन लोकसभा आणि २३ विधानसभा या भाजपामधील मूळ नेत्यांसाठी राखीव ठेवल्या पाहीजेत.”

Story img Loader