मुंबई : माझ्यासाठी भाजप प्रवेशाचा विषय आता संपला असून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, असे ज्येष्ठ नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधामुळे कदाचित माझा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकला नसावा, असे मत खडसे यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुख्यमंत्रिपदाच्या ‘बिहार पॅटर्न’ची अफवा; अजित पवार यांचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या खडसे यांनी लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते व निवडणुकीत भाजपसाठी प्रचार केला होता. त्यांच्या सून रक्षा खडसे निवडून आल्या व त्यांना केंद्रात मंत्रिपदही मिळाले आहे. मात्र खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकलेला नाही. यासंदर्भात विचारता खडसे म्हणाले, भाजपमध्ये प्रवेशासाठी मी विनंती केली नव्हती. लोकसभा निवडणुकीआधी भाजपच्या वरिष्ठ केंद्रीय नेत्यांनी सूचना केल्यामुळे मी नवी दिल्लीत जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात घातला होता. मात्र जाहीरपणे प्रवेशासाठी मी चार-पाच महिने वाट पाहिली. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडलेला नाही.

हेही वाचा >>> भाजप निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दानवे

माझा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंजूर केलेला नाही. त्यामुळे आता मी भाजपमध्ये जाणार नाही. मी विधानसभा निवडणूक व त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचेच काम करीत राहीन. खडसे यांनी भाजपच्या स्थापनेपासून पक्षाचे काम केले होेते आणि फडणवीस, महाजन आदी नेत्यांना त्यांनी राजकीय पाठबळ दिले होते. मात्र, या नेत्यांच्या विरोधामुळे खडसे भाजपमध्ये प्रवेश होऊ शकला नाही, अशी खडसे यांची भावना आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior leader eknath khadse says he is with sharad pawar faction of ncp print politics news zws