Peoples Democratic Party पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)चे ज्येष्ठ नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री मुझफ्फर हुसेन बेग मंगळवारी (२० फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीत उपस्थित होते. रॅलीतील उपस्थितीने त्यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. पीडीपीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले बेग हे काश्मीरमधील प्रमुख पहाडी नेते आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडच्या काही दिवसांत इतर पक्षांतील अनेक प्रमुख आदिवासी नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. परंतु, जर बेग यांनी भाजपात प्रवेश केला तर ते काश्मीर प्रांतातील पहिले पहाडी नेते असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुझफ्फर हुसेन बेग यांनी आपण भाजपामध्ये सामील होणार की नाही याबद्दल पुष्टी केलेली नाही. परंतु, यावर त्यांनी अद्याप नकारही दिलेला नाही. त्यांना पक्ष प्रवेशाबद्दल विचारले असता, “एखादी व्यक्ती पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यासाठी येऊ शकत नाही का?,” असा प्रश्न त्यांनी केला. रॅलीत सहभागी होण्याबद्दल विचारले असता, हे माझे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “सहभागी होणे आवश्यक नाही, परंतु त्यांच्या (पंतप्रधानांच्या) कार्यक्रमांमध्ये मी माझे कर्तव्य पार पाडीन.” बेग यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले. ते म्हणाले, पंतप्रधानांशी माझे नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात जम्मू-काश्मीरने मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. “मी सरकारमध्ये असल्यापासून (मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वातील पीडीपी-काँग्रेस सरकार) पंतप्रधान मोदींशी माझे चांगले संबंध आहेत… त्यांनी (पंतप्रधान) मला कधीही माझ्या पक्षाबद्दल विचारले नाही. आमच्या लोकांना काय हवे आहे, हेच त्यांनी विचारले.”

पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

१९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात पीडीपीच्या स्थापनेपासून बेग यांनी जिल्हा विकास परिषदेच्या निवडणूक तिकिटावरून पक्षाशी मतभेद निर्माण केले होते. मार्च २०२१ मध्ये त्यांनी सज्जाद लोनच्या पीपल्स कॉन्फरन्समध्ये प्रवेश केला होता. प्रवेशाच्या काही महिन्यांनंतरच त्यांची हकालपट्टीही करण्यात आली. बेग गेल्या महिन्यातच पीडीपीमध्ये पुन्हा सामील झाले. यावेळी पीडीपी कधी सोडणार नाही, असा दावाही त्यांनी केला. पीडीपी नेते त्यांच्या परतण्याने फारसे खूश नव्हते, कारण बेग यांनी कलम ३७० रद्द करण्यात आला तेव्हा पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती. केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या अवघ्या सहा महिन्यांनंतर जानेवारी २०२० मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुफ्ती यांच्यासह पीडीपीतील बहुतेक नेते तुरुंगात असताना आणि सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असतानाही बेग यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता. पंतप्रधानांच्या रॅलीतील बेग यांच्या उपस्थितीबद्दल विचारले असता, पीडीपीच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्याने सांगितले की, बेग यांनी औपचारिकपणे पुन्हा पक्षात प्रवेश केलेला नाही.

जम्मू-काश्मीरमधील अनुसूचित जमातींसाठी केंद्राने घेतलेल्या निर्णयाचा प्रभाव

अलीकडेच जम्मू आणि काश्मीरमध्ये इंडिया आघाडीच्या जागा वाटपात येत असलेल्या समस्येदरम्यान नॅशनल कॉन्फरन्स भाजपासोबत चर्चा करत असल्याचे सांगितले जात होते. एनसीचे वरिष्ठ नेते उमर अब्दुल्ला यांनी या चर्चा फेटाळल्या. ते म्हणाले, काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी या अफवा पसरवल्या होत्या. संसदेने जम्मू-काश्मीरमधील अनुसूचित जमातींचा दर्जा वाढवणारे विधेयक मंजूर केल्याच्या काही काही आठवड्यातच बेग मोदींची प्रशंसा करताना दिसत आहेत. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे पहाडी भाषिक वांशिक गटांना याचा फायदा होणार आहे. पूर्वी केवळ जम्मू आणि काश्मीरमधील शिनांसह गुज्जर आणि बेकरवालांना विशिष्ट सोयी मिळत होत्या. केंद्राच्या या भूमिकेवर गुज्जर आणि बेकरवालांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : शेतकर्‍यांबरोबर चर्चेच्या चौथ्या फेरीत काय ठरले? शेतकऱ्यांसाठी केंद्राची पंचवार्षिक योजना काय आहे?

भाजपानुसार, कलम ३७० नंतर राजकीय आरक्षणासह अनुसूचित जमातींना इतरही अनेक फायदे आणि संरक्षण मिळणार आहे. अलीकडेच अब्दुल कयूम मीर आणि इक्बाल मलिक या नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रमुख पहाडी नेते शहनाज गनई आणि मुश्ताक बुखारी यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आणि भाजपाच्या भूमिकेला आपले समर्थन दिले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior leader of pdp is supposed to join bjp rac
Show comments