संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीन आठवड्यांपूर्वी सत्तेत आलेल्या राजस्थानमधील भाजप सरकारला पहिलाच मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या सरकारमधील मंत्री सुरेंद्रपाल सिंग टीटी यांचा निवडणुकीत ११ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव झाला. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने उमेदवार असलेल्या सुरेंद्रपाल यांचा मंत्रिमंडळात समावेश केला होता, पण निवडणुकीत त्यांची डाळ शिजू शकली नाही.

राजस्थान विधानसभेसाठी नोव्हेंबरमध्ये निवडणूक झाली होती. निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात काँग्रेस उमेदवाराचे निधन झाल्याने मतदारसंघातील निवडणूक स्थगित करण्यात आली होती. कारण निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवाराचे निधन झाल्यास त्या मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात येते. राजस्थान निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले आणि अनपेक्षितपणे भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. स्थगित झालेल्या करणपूर मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. यानुसार दोन दिवसांपूर्वी या मतदारसंघात मतदान झाले होते.

हेही वाचा… मोदींच्या सभेपूर्वी आदित्य ठाकरे यांचा नवी मुंबईत एल्गार, दिघा स्थानक, पर्यावरणाच्या मुद्दयावरुन सरकारला घेरले

भाजपने या मतदारसंघातील उमेदवार सुरेंद्रपाल सिंग यांचा मंत्रिमंडळात समावेश केला होता. सिंग यांना निवडणूक अवघड असल्यानेच भाजपने मतदारांवर प्रभाव पाडण्याकरिता वेगळी खेळी केली होती. सिंग यांचा मंत्रिमंडळात समावेश करून त्यांचे राजकीय महत्त्व वाढविले होते. तसेच मतदारसंघाचा आमदार मंत्री झाल्याने मतदारांवर प्रभाव पाडता येईल, असे भाजपचे गणित होते. मतदारसंघाचा आमदार मंत्री, असाच प्रचार भाजपने केला होता. सिंग यांचा मंत्रिमंडळात राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) म्हणून समावेश करून त्यांच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती, अल्पसंख्याक विकास अशी खाती सोपविण्यात आली होती. सिंग यांच्या मंत्रिमंडळ समावेशास काँग्रेसने आक्षेप घेतला होता. कारण निवडणुकीच्या तोंडावर सिंग यांचा मंत्रिमंडळात समावेश करून भाजपने आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती.

निवडणुकीत मतदारांनी मंत्री सिंग यांना नाकारले आहे. काँग्रेस उमेदवार रुपेंद्रसिंह कुनेर यांनी सुरेंद्रपाल सिंग टीटी यांचा ११ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. दोनच दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप करण्यात आले. म्हणजे सरकारचा कारभार आताशी कुठे सुरू होत असतानाच भाजप सरकारला नमनालाच मोठा फटका बसला आहे.

हेही वाचा… सांगलीत राष्ट्रवादी अंतर्गत फोडाफोडी जोरात

राजस्थान भाजपमध्ये सारे काही आलबेल नाही. मुख्यमंत्रीपदी वसुंधराराजे किंवा अन्य नेत्यांना डावलून भाजपने पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आलेल्या भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. सरकार किंवा विधानसभेचा काहीच अनुभव नसलेल्या शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून कुरबुरी झाल्या. कारण अनेक आमदारांना मंत्रिपद हवे होते. ही सारी कसरत मुख्यमंत्री शर्मा करीत असतानाच विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. मतदारांना गृहित धरता येत नाही हा भाजपला मोठा धडा आहे. कारण महिनाभरापूर्वी भाजपला कौल देणाऱ्या मतदारांनी भाजपलाच एका मतदारसंघात धक्का दिला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Setback for bjp in rajasthan minister rajendra pal singh is defeated by congress candidate rupinder singh kooner in karanpur bypoll election print politics news asj
Show comments