दीपक महाले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव: महाविकास आघाडी एकसंघ नसल्याने दूध संघानंतर जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्षपदही गमवावे लागले आहे. जिल्हा बँकेत बहुमत असूनही आघाडीचा उमेदवार पराभव होऊन राष्ट्रवादीचे बंडखोर माजी आमदार संजय पवार हे निवडून आले. यानंतर एकनाथ खडसे यांनी काँग्रेस, ठाकरे गटाने विश्वासघात केल्याचा आरोप केला. त्यावर खडसेंना आघाडी टिकवायची नाही, असेच यावरून दिसत आहे असे प्रत्युत्तर काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी दिले. यातुन जिल्ह्यात आघाडीतील ही बिघाडी भाजप-शिंदे गटासाठी भविष्यात फायदेशीर ठरु शकते.

जिल्हा बँकेच्या २०२१ च्या अखेरीस झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलला बहुमत मिळाले होते. यानंतर अध्यक्षपदी गुलाबराव देवकर, तर उपाध्यक्षपदी श्यामकांत सोनवणे यांची निवड झाली होती. ठरल्यानुसार एक वर्षाने दोन्ही पदे बदलण्यात येणार होती. काही दिवसांपूर्वी देवकर आणि सोनवणे यांनी पदाचे राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त पदांसाठी जिल्हा बँकेच्या सभागृहात निवड प्रक्रिया राबविण्यात आली.

महाविकास आघाडीकडे बहुमत असल्याने अध्यक्ष त्यांचाच होणार हे जवळपास निश्चित होते. तरीही पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन या मंत्र्यांनी हालचालींना सुरुवात केली. उपाध्यक्षपदासाठी शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांचे पुत्र अमोल पाटील यांचे नाव गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निश्‍चित करण्यात आले होते. अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी महाविकास आघाडीची बैठक राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील गटनेते एकनाथ खडसेंच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित केले. निवड प्रक्रिया सुरु झाल्यावर अ‍ॅड. रवींद्र पाटील यांचे नाव निश्‍चित झाल्यानंतरही राष्ट्रवादीचेच संजय पवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. पवार यांना राष्ट्रवादीतील एक गट आणि शिंदे गटाच्या संचालकांचा पाठिंबा मिळाल्याची चर्चा आहे. एकूण २१ पैकी ११ मते मिळवून पवार यांनी बाजी मारली. उपाध्यक्षपदी अमोल पाटील यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे १०, शिवसेना ठाकरे गटाचे दोन, काँग्रेसचे तीन, शिवसेना शिंदे गटाचे पाच, भाजपचा एक असे बलाबल आहे.

खडसेंचा आरोप

राष्ट्रवादीची मते पक्षाबरोबर राहिली. एकाने बंडखोरी केली. काँग्रेस, ठाकरे गटाने विश्‍वासघात केल्याने फटका बसल्याचा आरोप खडसे यांनी केला. जिल्हा बँकेची निवडणूक लढवायला कोणीही तयार नव्हते. सर्वांच्या मदतीने आपण पुढाकार घेत ही बँक ताब्यात आणली. हे राष्ट्रवादीचे आहेत, हे मानायला आपण तयार नाही असे खडसे यांनी स्पष्ट केले. चार-पाच दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील यांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर पवार हे बसले होते. दूध संघाच्या निवडणुकीतही पवार हे गुलाबराव पाटील यांच्या पॅनलमध्ये होते. त्यावरून पवार यांची भूमिका ही संशयास्पद राहिली आहे. विरोधकांशी हातमिळवणी करून बंडखोरी करण्याच्या विचारात ते आहेत असे अजित पवार आणि जयंत पाटील यांना सांगितले होते, असा दावाही खडसे यांनी केला आहे.

सहकारात राजकारण नाही

अध्यक्षपदी निवडून आलेले राष्ट्रवादीचे बंडखोर पवार यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले. सहकार क्षेत्रात पक्ष नसतो, असे आमचे नेते अजित पवार नेहमी सांगतात. पवार हेच माझे नेते आहेतच; परंतु या निवडणुकीत ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ज्येष्ठ संचालक चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार संजय सावकारे या सर्वांनी सहकार्य केल्याचा दावा केला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही काँग्रेसची मदत झाल्याचा दावा करुन आघाडीतील असंतोष दाखवून दिला आहे.

काँग्रेसचे प्रत्युत्तर

खडसे यांनी काँग्रेसवर आरोप केल्यानंतर जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार आणि आमदार शिरीष चौधरी यांनी त्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. काँग्रेसच्या तिन्ही संचालकांनी आघाडीच्याच उमेदवाराला मतदान केले. खडसे हे काँग्रेसचे नाव घेऊन बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गुप्त मतदान पद्धतीत काँग्रेसची मते फुटली, हे खडसेंना कसे कळले, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीतच बंडाळी असून, खडसेंनी आत्मपरिक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. महाविकास आघाडीकडे २१ पैकी १५ मते असताना खडसेंनी उपाध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी सोडून शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा का दि ला? बहुमत असताना त्यांनी काँग्रेस किंवा ठाकरे गटाचा उमेदवार उपाध्यक्षपदासाठी देणे अपेक्षित होते. त्यामुळे शिंदेंबरोबर काँग्रेस नव्हे तर, राष्ट्रवादी गेली असल्याचा आरोप प्रदीप पवार यांनी केला. दूध संघानंतर जिल्हा बँक अध्यक्षपदही हातातून गेल्याने आणि काँग्रेसने केलेल्या आरोपांमुळे खडसे यांना आता यापुढे शिंदे गट, भाजपसह काँग्रेसच्या विरोधालाही तोंड द्यावे लागणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Setback to eknath khadse in jalgaon district bank president election print politics news asj