मुंबई : मराठा समाजाचा मुख्यमंत्री न करता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्यास या समाजात कोणती प्रतिक्रिया उमटेल, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला त्याचा फटका बसणार का, आदी मुद्द्यांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याशी बुधवारी रात्री नवी दिल्लीत चर्चा केली. फडणवीस हे ब्राह्मण असल्याने आणि मराठा समाजात फडणवीस यांच्याविरोधात नाराजीचे वातावरण असल्याने त्यांना मुख्यमंत्रीपद दिल्यास भाजपला त्याचा त्रास होईल का किंवा अन्य एखाद्या मराठा नेत्याचा विचार होऊ शकेल का, या मुद्द्यांवर शहा व तावडे यांच्यात चर्चा झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाच्या खात्यांच्या वाटपाबाबत चर्चेसाठी शहा यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना गुरुवारी रात्री बैठकीसाठी नवी दिल्लीत आमंत्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांना हे पद दिल्यास मराठा समाजाकडून विरोध होईल का, यासंदर्भात शहा यांनी बुधवारी रात्री तावडे यांच्याशी सुमारे पाऊण तास चर्चा केली. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्याविरोधात अनेकदा टीकास्त्र सोडले असून आताही सरकारस्थापनेनंतर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

हेही वाचा >>>नागपुरात मंत्रिपद शहराला की ग्रामीणला?

शिंदे हे मराठा समाजातील नेते असून त्यांना दूर करून ब्राह्मण समाजातील फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद दिल्यास त्याची प्रतिक्रिया समाजात उमटण्याची भीती भाजपला वाटत आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा फटका बसेल, असेही काही नेत्यांना वाटत आहे. या मुद्द्यांवर शहा व तावडे यांच्यात बैठक झाल्याने भाजप पक्षश्रेष्ठींकडून फडणवीस यांच्याऐवजी मराठा समाजातील नेत्याचाही विचार केला जाणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah discusses with tawde regarding non maratha chief minister post print politics news amy