छत्रपती संभाजीनगर : जातींच्या गणितांपेक्षाही महिला म्हणून होणारे मतदान भाजपकडे मिळावे यासाठी खासे प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षांत घरातील महिला पुरुषांपेक्षा आपले मत वेगळे आहे आणि ते स्वतंत्रपणे नोंदवता येते, याची जाणीव निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बचत गट हे त्याचे माध्यम ठरावे अशी रचना आता करण्यात आली आहे. देशातील एक कोटी बचत गट आणि त्यातील ११ कोटी महिलांना जोडणारे शक्तीवंदन नावाचे व्यासपीठ आता भाजपने तयार केले असून त्याच्या संयोजक म्हणून डॉ. विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला मतदार हा आपला केंद्रस्थानी असेल असा संदेश भाजपने दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जनधन योजनेपासून ते मुद्रा योजनेपर्यंत स्वतंत्रपणे महिला लाभार्थींची संख्या वाढविण्यासाठी भाजपने सुरुवात केली होती. पहिल्या काही वर्षांत घरगुती गॅसची टाकी देण्याची उज्ज्वला योजना आखण्यात आली. अनेक महिलांना त्याच्या पहिल्या टप्प्यात लाभ झाला. मात्र, जसजशा टाकीच्या किंमती वाढत गेल्या तसतसा या योजनेचा प्रचार कमी करण्यात आला. शेवटी टाक्यांचा दर आणि मिळणाऱ्या सवलतीचे काही पैसे मिळाल्यानंतर दुसरी टाकी घेण्यात महिलांचा सहभाग कमी होत गेला. पण उज्ज्वला योजनेमुळे आपल्या घरात ‘गॅस’ आल्याचे कोण कौतुक शिल्लक असणाऱ्या महिला भाजपच्या मतदार असायला हव्यात अशी रचना आजही केली जात आहे. विविध योजनांमधील महिला मतदारांबरोबर बचत गट असणाऱ्या महिलांशी सातत्याने संवाद ठेवत दोन लाख ‘लखपती दिदी’ करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. लखपती दिदीबरोबरच ‘ड्रोन दिदी’ ही संकल्पनाही आता अवलंबली जाणार आहे. शेतीमधील फवारणीची कामे पुढील काळात महिला बचत गटांना देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. गावागावातील महिलांना अधिक काम देण्याच्या याेजना आता आखल्या जात आहेत.

हेही वाचा – रावसाहेब दानवे यांना अनुकूल वातावरण, विरोधात सक्षम उमेदवाराचा शोध सुरू

लाभार्थी महिलांना भाजपशी जोडून घेणारे विविध कार्यक्रम देशभर आखले जात आहेत. बचत गट बांधणीसाठी काम करणाऱ्या सहयोगिनी आणि गट प्रवर्तकांना पारितोषक देण्यापासून ते बचत गटातील महिलांना जोडणारे अनेक प्रयोग आता राजकीय छत्री घेतले जाणार आहेत. बचतगटांना जोडणारा पूल तयार करणे हे ‘शक्तीवंदन’ चे काम असणार आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर विविध योजनांमध्ये महिलांचा सहभाग वाढल्यानंतर महिला मतपेढीची चर्चा देशभर सुरू झाली. आता ही मतपेढी बांधण्याची तयारी भाजपने केली असल्याचे दिसून येत आहे. विजया रहाटकर यांना या कामी नेमण्यात आले आहे. त्यांनी या पूर्वी राजस्थान निवडणुकीमध्ये सहप्रभारी म्हणून काम केले आहे. विविध योजनांमधील लाभार्थींना मतदार बनविण्याची एक प्रक्रिया पद्धतशीरपणे हाती घेण्यात आलेली आहेच. या पूर्वीही महिला बचत गटांना प्रलोभन देऊन निवडणुकीमध्ये आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, लाभार्थी व्यक्तीला ‘सरकारने तुमच्यासाठी काय केले आहे’ हे सांगण्याची गती येत्या काही दिवसांत वाढणार आहे. काही मेळावे आणि पारितोषिके देऊन व प्रोत्साहन देऊन भाजपच्या बाजूने महिला पतपेढी वळविण्यासाठी प्रयत्न होतील, असे आता सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय, मध्य प्रदेशची कार्यकारिणी विसर्जित!

देशभरात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियातून ‘उमेद’च्या माधमातून बचतगट बांधले जातात. तसेच राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळाकडूनही बचतगट बांधले जातात. विशेष म्हणजे बचतगटांना दिलेले कर्ज फेडण्याचे उद्दिष्ट आता ९५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने गावागावातील हुशार महिलांवर भाजपने लक्ष्य केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shakti vandan dalan from bjp for the construction of womens vote bank print politics news ssb