काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांना रोहित शर्मावर केलेल्या टीकेमुळे प्रचंड खोचक प्रतिक्रियांना सामोरं जावं लागत आहे. रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पार पडला. यामध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. या सामन्यात रोहितने १७ चेंडूंमध्ये १५ धावा केल्या, यावरूनच शमा मोहम्मद यांनी रोहित शर्मावर टीका केली.
काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्म्द यांना रोहित शर्मावर केलेल्या वक्तव्यामुळे प्रचंड टीकेला सामोरं जावं लागत आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराबाबत अशाप्रकारे वक्तव्य केल्याने शमा यांना क्रिकेट चाहत्यांनी चांगलंच धारेवर धरलं. शमा यांनी कर्णधार रोहित शर्माच्या शरीरयष्टीबद्दल टीका करत तो लठ्ठ आणि वाईट कर्णधार असल्याचं वक्तव्य एक्सवर केलं होतं. या वक्तव्यावर क्रिकेट चाहत्यांनी त्यांना सुनावल्यानंतर शमा यांनी ती पोस्ट डिलिट केली.
शमा मोहम्मद यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकांमध्ये पक्षाला वाचवू न शकणाऱ्या लोकांनी वर्ल्डकप जिंकणाऱ्या कर्णधाराबद्दल बोलू नये, अशी प्रतिक्रिया भाजपाने दिली आहे.
शमा मोहम्मद यांनी काय टीका केली होती?
शमा मोहम्मद म्हणाल्या होत्या की, “रोहित शर्मा हा एक लठ्ठ खेळाडू आहे, त्याने वजन कमी करणं गरजेचं आहे आणि तो आतापर्यंतचा भारताचा सर्वात वाईट कर्णधार आहे.”
रविवारी भारताच्या विजयानंतर संघाचे खूप कौतुक झाले. यामध्ये रोहित शर्माच्या कौतुकास्पद पोस्टवर प्रतिक्रिया देत त्याच्यात जागतिक दर्जासारखं काय आहे? तो एक साधारण खेळाडू आहे, ज्याला भारताचा कर्णधार होण्याचा मान मिळाला असंही शमा यांनी पोस्ट केले. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, एम एस धोनी, विराट कोहली, कपिल देव आणि रवि शास्त्री यांच्या तुलनेत तो एक साधारण खेळाडू आहे असं त्या म्हणाल्या.
दुसरीकडे शमा यांनी केलेल्या वक्तव्यावरून पक्षाची भूमिका दिसून येत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी दिली.
या सगळ्यानंतर शमा यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे. “हे एका खेळाडूबाबत एक साधारणसं फिटनेस ट्विट होतं, ते बॉडी-शेमिंगबाबत अजिबात नव्हतं. मला कायम असं वाटतं की, एका खेळाडूने नेहमी फिट रहायला हवं आणि रोहित मला लठ्ठ असल्यासारखा वाटतो, हे फक्त मी ट्विट केलं. माझ्या या वक्तव्यावर उगाचंच एवढ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. मी जेव्हा आधीच्या भारतीय संघाच्या कर्णधारांशी त्याची तुलना केली, तेव्हा एक साधं वक्तव्य केलं आणि मला बोलण्याचा अधिकार आहे, ही लोकशाही आहे”…
कोण आहेत शमा मोहम्मद?
- शमा मोहम्मद या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि मीडिया पॅनेल सदस्य म्हणून काम करतात.
- त्यांचा जन्म १७ मे १९७३ साली केरळमधील कन्नूर इथे झाला, त्या एक दंतचिकित्सकदेखील आहेत.
- त्यांनी कुवेतमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर भारतात परतल्या. मंगळुरू इथील येनेपोया विद्यापीठातून त्यांनी डेंटल सायन्सची पदवी घेतली.
- राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी काही काळ एका वृत्तवाहिनीमध्ये पत्रकार म्हणूनही काम केले.
- २०१५ मध्ये शमा या काँग्रेस पक्षाच्या सदस्य झाल्या आणि त्याचवर्षी जुलैमध्ये त्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम करू लागल्या.
- डिसेंबर २०१८ मध्ये त्या नॅशनल मीडिया पॅनेल सदस्य बनल्या.
- मोहम्मद या विवाहित असून त्यांना दोन मुलं आहेत.
शमा मोहम्मद यांचे भूतकाळातील वादविवाद
एप्रिल २०२४ मध्ये केरळमधील कोझिकोडा इथे द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी शमा मोहम्मद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका सभेला संबोधित करताना जर भाजपा केंद्रात पुन्हा सत्तेत आले तर अल्पसंख्यांक समुदायांच्या प्रार्थनास्थळांना धोका निर्माण होईल असे त्यांनी म्हटले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दंगल घडवण्यास कारणीभूत चिथावणीखोर भाषण करणे, निवडणुकांदरम्यान समुदायांमध्ये वाद निर्माण करणे अशा आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. निवडणूक आयोगाने पाठवलेल्या तक्रारींच्या आधारे हे गुन्हे दाखल केले होते. यावर आपल्या धार्मिक भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि मी माझ्या मतावर ठाम आहे असे वक्तव्य शमा यांनी त्यावेळी केले होते.
भाजपाची प्रतिक्रिया काय?
भाजपा नेते शहजाद पुनावाला यांनी रोहित शर्मावरील वक्तव्यावरून शमा यांच्यावर टीका केली आहे. “राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निवडणुका हरलेले लोक रोहित शर्माच्या कर्णधारपदाला अप्रभावी म्हणत आहेत. कर्णधार म्हणून रोहितचा रेकॉर्ड हा उत्तमच आहे”, असे पुनावाला यांनी म्हटले.
“हे खूपच लज्जास्पद आहे की एका राष्ट्रीय प्रवक्त्यांनी अशाप्रकारे वक्तव्य करावे. हे काँग्रेसचे वक्तव्य आहे, त्यांना असं वाटतं की सगळ्यासाठी एकच व्यक्ती योग्य आहे, ते म्हणजे राहुल गांधी”, अशी टीका भाजपाचे दिल्लीतील नेते मनजिंदर सिंग यांनी केली आहे.