चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्माला उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद अडचणीत सापडल्या. रोहित शर्मा लठ्ठ असल्याचं शमा म्हणाल्या होत्या. काँग्रेस बहुतांश वेळा भाजपाविरुद्ध वक्तव्य करण्यासाठी धडपडत असते. मात्र, काँग्रेसच्या अशा वक्तव्यांचा वापर करून भाजपा कायम काँग्रेस पक्षाला धारेवर धरत आली आहे.

शमा मोहम्मद यांच्यावर विविध स्तरांतून टीका होत असताना काँग्रेसने स्वत:ला या वादापासून सोईस्करपणे दूर ठेवले. तसेच शमा यांना रोहित शर्माविषयी केलेली एक्सवरील पोस्टही पक्षाने डिलीट करण्यास सांगितली.

शमा यांच्या या वक्तव्यावरून सत्ताधारी भाजपानं आत्मविश्वासू भारताचा काँग्रेस द्वेष करत असल्याचा आरोप केला. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया म्हणाले, “शमा मोहम्मद यांनी केलेलं विधान अत्यंत लज्जास्पद आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) या विधानाला दुर्दैवी म्हटलं आहे. अशा प्रकारच्या वादाचा सामना करायची काँग्रेसची ही काही पहिलीच वेळ नाही. नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे काँग्रेस पक्ष अडचणीत सापडतो. परिणामी याचा भाजपानं लगोलग टीका करण्यासाठी वापर केला.

गेल्या महिन्यात इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे जवळचे सहकारी सॅम पित्रोदा यांनी पक्षाला नव्या वादात टाकलं होतं. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं, “मला समजत नाही की, भारताला चीनकडून असा काय धोका आहे. चीनला शत्रू मानण्याऐवजी त्यांचा सन्मान करायला हवा. आपण सर्वांनी एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. भारतानं चीनबाबतचा आपला दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे”. दुसरीकडे चीननं भारताचा बराच भूभाग ताब्यात घेतल्यावरून काँग्रेस पक्षानं एनडीए सरकारला लक्ष्य केलं होतं. पित्रोदा यांच्या वक्तव्यापासून जाणीवपूर्वक दूर राहत काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी व कम्युनिकेशन्सचे प्रभारी जयराम रमेश म्हणाले, “पित्रोदा यांनी मांडलेलं विधान हे नक्कीच काँग्रेसचे विचार नाहीत”.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही पित्रोदा यांनी काँग्रेसला अडचणीत टाकलं होतं. मे २०२४ मध्ये एका पॉडकास्टमध्ये त्यांना भारताच्या विविधतेबाबत प्रश्न विचारला असता, “पूर्वेकडील लोक चीनच्या लोकांसारखे दिसतात, पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात, उत्तरेकडील लोक कदाचित गोरे दिसतात व दक्षिणेकडील लोक आफ्रिकन लोकांसारखे दिसतात”, असं उत्तर पित्रोदा यांनी दिलं होतं.

हे वांशिक वक्तव्य केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. त्यांनी काँग्रेसवर वर्णद्वेषी मानसिकता आणि त्वचेच्या रंगावरून देशाचं विभाजन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. यावेळीही काँग्रेसनं या वादापासून स्वत:ला दूर ठेवलं आणि पित्रोदांचं असं वक्तव्य सर्वांत दुर्दैवी व अस्वीकार्य असल्याचं म्हटलं. त्यानंतर पित्रोदा यांनी राजीनामा दिला होता. एकाच महिन्यानंतर त्यांची पुन्हा नियुक्तीही करण्यात आली.

एप्रिल २०२४ मध्ये संपत्तीवाटपाबाबत काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर भाजपा हल्ला करीत असतानाच पित्रोदा यांनी अमेरिकेतल्या वारसाकरणावर वक्तव्य केलं. ते म्हणाले, “अमेरिकेत तर वारसा संपत्तीवरही कर आहे. जर कोणाकडे १०० दशलक्ष डॉलर्स संपत्ती आहे, तर त्याच्या मृत्यूनंतर ४५ टक्के संपत्ती जर मुलांना मिळत असेल, तर उरलेली ५५ टक्के संपत्ती सरकार घेते”. त्यावर लोकांनी त्यांच्या मुलांसाठी मागे ठेवलेली मालमत्ताही काँग्रेस हिसकावून घेईल अशी टीका पंतप्रधानांनी केली असं होईल. त्यानंतर वारसा कर लागू करण्याची आमची कोणतीही योजना नव्हती, असं काँग्रेसला स्पष्ट करावं लागलं होतं.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या मध्यात भारतातल्या बालाकोट हवाई हल्ल्यानंतर त्यातील मृतांची संख्या आणि पुरावे पित्रोदा यांनी मागितले होते. मात्र, पित्रोदा यांच्या मताशी काँग्रेस पक्षाच्या मताचा काहीही संबंध नसल्याचे काँग्रेसने यावेळी स्पष्ट केले. ही संधी साधून भाजपानं पुन्हा काँग्रेसवर आगपाखड केली होती.

जानेवारी २०२३ मध्ये ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी उरी हल्ल्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. उरी हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानविरुद्ध केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबाबत त्यांनी प्रश्न निर्माण केले होते. या सर्जिकल स्ट्राईकबाबत कोणतेही पुरावे दिले नसल्याचे आणि खोटी माहिती पसरवल्याचा आरोप मोदी सरकारवर केला होता. तसेच पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांनी जीव का गमावला, याबाबतचा अहवाल संसदेत सादर न केल्याबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली होती.
यावरून भाजपानंही काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. “काँग्रेस पंतप्रधान मोदींबाबत द्वेषपूर्ण भावनेनं आंधळी झाली आहे. त्यांनी देशाच्या सशस्त्र दलांचा अपमान केला आहे, अशी टीका केली होती. यावेळीसुद्धा काँग्रेसनं या वादाबाबत पक्षाला दूर ठेवलं होतं.

जुलै २०१६ मध्ये काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत काश्मीरच्या परिस्थितीवर वक्तव्य केलेृं. हिजबुल मुझाहिद्दीनचा कमांडर बुरहान वाणीच्या हत्येनंतर काश्मीर खोऱ्यातील अशांततेबाबत त्यांनी टीका केली होती.

फेब्रुवारी २०१५ मध्ये काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरू याची फाशी चुकीची आणि अयोग्य पद्धतीची असल्याचं म्हटलं होतं. त्यावर याही वादातून काढता पाय घेत, यूपीए सरकारनं कायद्याच्या सर्व प्रक्रियांचं पालन करीतच ही फाशी दिलेली आहे, असं काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आलं.

Story img Loader