पुणे/बारामती :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी बारामतीमध्ये पवार कुटुंबीय एकत्र येऊन पाडवा साजरा करणार का, याबाबत असलेली उत्सुकता संपली असून, बारामतीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतंत्रपणे पाडवा साजरा करणार असल्याचे निश्चित झाले आहे. शरद पवार हे गोविंदबागेत, तर अजित पवार काटेवाडीत पाडवा साजरा करणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीमध्ये पवार कुटुंबीयाच्या वतीने पाडवा साजरा केला जातो. पाडव्यासाठी पवार कुटुंबीय गोविंदबागेत एकत्र येतात. या दिवशी राज्यातील विविध भागांतून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची भेट घेत पवार कुटुंबाकडून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. बारामतीमधून अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार हे मैदानात आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा पवार कुटुंबीयांकडून साजरा केला जाणारा दिवाळी पाडवा एकत्रित साजरा होणार का, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते तीन ते चार दिवस बारामतीमध्ये ठाण मांडून बसले आहेत.
हेही वाचा : Mallikarjun Kharge: केवळ सवंग घोषणा नकोत! मल्लिकार्जुन खरगेंचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे यंदाच्या वर्षी पवार कुटुंबीयांचा पाडवा एकत्र होणार नसल्याचे निश्चित झाले आहे. शरद पवार हे गोविंदबागेत, तर अजित पवार हे काटेवाडीत नागरिकांना भेटणार आहेत. पाडवा एकत्र साजरा करण्याची परंपरा खंडित होण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता ते म्हणाले, की गोविंदबागेत होणारी गर्दी आणि रांग कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : PM Narendra Modi: मोदींच्या सभांचा ८ नोव्हेंबरपासून धडाका
भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत थांबावे लागते. जनतेचा त्रास कमी करण्यासाठी काटेवाडीत पाडवा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी पाडवा वर्षानुवर्षे काटेवाडीतच साजरा केला जात होता.
अजित पवार, उपमुख्यमंत्री
© The Indian Express (P) Ltd