सांगली : महाविकास आघाडीतील राज्यातील विधानसभेच्या जागा वाटपावर प्राथमिक पातळीवर बोलणी सुरू असताना राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी तासगाव-कवठेमहांकाळचा उमेदवार शेतकरी मेळाव्यात जाहीर केला. माजी उपमुख्यमंत्री स्व. आरआर आबांचे वारसदार म्हणून रोहित पाटील विधानसभेच्या मैदानात उतरत असल्याने औत्सुक्य तर राहणारच पण यावेळी त्यांनी मोठा अथवा छोटा पैलवान मैदानात आला तर मी लढण्यास सज्ज असल्याचे सांगत मतदार संघातील पारंपारिक विरोधक भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांना खुले आव्हान दिले आहे.

जिल्ह्यात सर्व राजकीय पक्षांची उमेदवारीसाठी चाचपणी सुरू आहे. दिवसागणिक इच्छुकांची संख्या वाढत आहे. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये महायुतीतील भाजप आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यातच लढत होण्याची चिन्हे आहेत. तसा हा मतदार संघ स्व. आरआर आबांना कायम साथ देणारा असला तरी एकेकाळी माजी खासदार पाटील यांनी आबांनाही जेरीस आणले होते. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये केवळ ३ हजार ४९७ आणि २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ६ हजार ३०४ मतांनी आरआर आबा विजयी झाले होते. यामुळे आबांचा हा मतदार संघ राष्ट्रवादीसाठी सुरक्षित मानला जात नव्हता. यामुळे माजी खासदार पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन विधानपरिषदेचे आमदार करण्यात आले होते. यानंतरच आबांसाठी हा मतदार संघ सुरक्षित झाला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काकांनी भाजपमध्ये प्रवेश करत खासदारकी पटकावली. यानंतरच तासगावचा राजकीय संघर्ष सौम्य झाला. अंतर्गत साटेलोट्यात खासदारकी काकांना आणि आमदारकी आबा गटाला अशी राजकीय सोयरीक मान्य करण्यात आली.

हेही वाचा…तारीख ठरली! प्रशांत किशोर स्थापणार नवा राजकीय पक्ष; दलित-मुस्लिमांना विशेष आवाहन

तथापि, गेल्या चार वर्षापासून खासदार गटाने आमदारकीवरही हक्क सांगण्याचा प्रयत्न सुरू केला. कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्र्वादीला एकहाती मिळालेली सत्ताही टिकवता आली नाही. मात्र, आबांच्या पश्‍चात राजकीय सूत्रे आबांचे बंधू जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्याकडेच राहिली. त्यांनी राजकीय डावपेच आखायचे आणि आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांचा चेहरा लोकसमोर आमदारकीसाठी पुढे ठेवायचा अशा पध्दतीने या मतदार संघाचे राजकारण गेली दहा वर्षे सुरू आहे. आता मात्र आबांचा मुलगा रोहित कोणतीही ग्रामपंचायत, पंचायत समिती अथवा जिल्हा परिषदेची निवडणुक न लढवता थेट आमदारकीच्या मैदानात उतरत आहे. यामागे पक्षाध्यक्ष खासदार पवार यांचे असलेले पाठबळच प्रामुख्याने कारणीभूत आहे.

दुसर्‍या बाजूला माजी खासदार संजयकाका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील हे भावी आमदार असतील असे संदेश समाज माध्यमावर लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याच्या अगोदरपर्यंत सुरू होते. वाढदिवसाच्या निमित्ताने तासगाव, कवठेमहांकाळमध्ये झळकलेले फलक हे भावी आमदार म्हणून प्रभाकर पाटील यांचेच होते. मात्र, लोकसभेतील पराभवानंतर हा गट मागे पडला आहे. गड मानल्या जाणार्‍या तासगावमध्येही भाजपचे मतदान कमी झाले. यामुळे या पराभवाच्या धक्यातून हा गट अद्याप सावरण्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या रोहितने आक्रमक भूमिका घेतली आहे.

हेही वाचा…बोईसरमध्ये ठाकूर, पाटील यांच्या अस्तित्वाची लढाई

महायुतीमध्ये या मतदार संघावर शिवसेनेचा दावा राहणार आहे. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये अजितराव घोरपडे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यावेळी ते पुन्हा शिवसेना शिंदे गटाकडून मेदानात उतरण्याची शक्यता दुर्मिळ वाटते. कारण लोकसभेवेळी त्यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्य असलेले अपक्ष विशाल पाटील यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. यामुळे जर शिंदे शिवसेनेने ही जागा आपल्याकडे घेतली तर उमेदवार कोण हा प्रश्‍न आहेच. आणि जर भाजपच्या वाट्याला ही जागा आलीच तर उमेदवारीसाठी प्राधान्याने माजी खासदार पाटील यांच्या नावाचाच प्राधान्याने विचार केला जाउ शकतो. महायुतीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही या जागेवर हक्क सांगितला जाउ शकतो. माजी खासदार पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील हे या मतदार संघातील भाजपचे प्रचार प्रमुख आहेत. यामुळे विरोधक कोण समोर येणार यावरच तासगाव-कवठेमहांकाळच्या लढतीतील चुरस अवलंबून असणार आहे.