पुणे/ बारामती: ‘मी चौदा निवडणुका लढलो आणि विजयी झालो. अजून दीड वर्ष मी राज्यसभेचा खासदार आहे. मुदत संपल्यानंतर पुन्हा राज्यसभेत जायचे की नाही, याचा विचार करावा लागेल. लोकसभा निवडणूक मी लढविणार नाही. आता किती निवडणुका लढवायच्या. त्यामुळे आता थांबले पाहिजे,’ अशा शब्दांत संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी येथे दिले.
बारामती शहर आणि ग्रामीण भागात शरद पवार यांच्या मंगळवारी सहा सभा झाल्या. त्या वेळी त्यांनी हे संकेत दिले. सक्रिय राजकारणात नसलो, तरी समाजकारण थांबविणार नाही. सत्ता नको; मात्र, लोकांची सेवा करायची आहे. त्यासाठी नवी पिढी, नवे नेतृत्व पुढे आले पाहिजे, हे सूत्र स्वीकारले आहे, असे सांगत पवार यांनी बारामती येथील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांना संधी देण्याचे आवाहनही केले.
हेही वाचा >>>Kolhapur North Vidhan Sabha Constituency : शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता ?
‘सत्तेत असताना लोकांमध्ये जाऊन कामे केली. शेतकरी कर्जमाफी, महिलांना संरक्षण विभागात संधी, राजकारणात महिला आरक्षण, शेतमालाची निर्यात असे अनेक निर्णय मी घेतले. आज राज्य ज्यांच्या ताब्यात आहे, त्यांना ते व्यवस्थित चालविता येत नाही. त्यामुळे राज्यात नव्या नेतृत्वाची फळी उभी करण्याचा संकल्प आहे. त्यासाठी लोकांची साथ हवी आहे,’ असे पवार म्हणाले.
तीस ते पस्तीस वर्षे निवडून आल्यानंतर नवीन पिढी तयार करण्याचे काम केले. लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही जबाबदारी मी अजित पवार यांच्याकडे सोपविली. तेव्हापासून अजित पवारच जबाबदारी सांभाळत होते. आता पुढच्या तीस वर्षांसाठी नव्या नेतृत्वाला संधी देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या ओळखणारा नेता हवा आहे. काळ बदलला आहे. उच्चशिक्षित, हुशार युवकांना संधी द्यावी लागणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.