पुणे/बारामती : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. कोणत्या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार द्यायचा, याबाबतचा एकत्र निर्णय घेण्यात येणार असून जागावाटपाची चर्चा येत्या दहा दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिली.
विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस हे तीन पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहेत. त्यानुसार महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू झाली आहे. काही जागांवरील गणिते आणि उमेदवारांच्या नावावर सहमती झाली आहे. पण, काही जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर बारामती दौऱ्यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना दहा दिवसांत जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला.महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू झाली आहे. कुठल्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा उमेदवार द्यायचा, याचा एकत्रित निर्णय घेतला जाईल, असे पवार यांनी सांगितले.
ते म्हणाले की, राज्यातील नागरिक परिवर्तनासाठी इच्छुक आहेत. आठ ते दहा दिवसांमध्ये तिन्ही पक्षांचे उमेदवारांबाबतचे एकमत होईल. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने होता. हीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीतही दिसून येईल.