सातारा : लोकसभेला फटका बसल्यामुळे महायुतीला लाडकी बहीण आठवली असल्याची टीका राष्ट्रवादीचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी फलटण येथे बोलताना केली.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष व आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगावचे आमदार दीपक चव्हाण यांनी सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, उत्तम जानकर, प्रभाकर देशमुख, अभयसिंह जगताप, अनिल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.या सभेपूर्वी आमदार रामराजे निंबाळकर आणि शरद पवार यांची एकत्र बैठक झाली. यानंतर त्यांच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला मात्र या पक्षांतरापासून रामराजे दूर राहिले आहेत.
हेही वाचा >>>Sangamner Vidhan Sabha Constituency 2024 : सुजय विखे संगमनेरमधून निवडणूक लढण्याचे आव्हान स्वीकारणार?
पवार म्हणाले, की लोकसभेच्या निवडणुकीत ४८ पैकी ३१ जागा महाविकास आघाडी जिंकल्यानंतर यांना सर्व समाज आणि लाडक्या बहिणी आठवल्या. राजकारण्यांपेक्षा लोक अधिक शहाणे आहेत. त्यांना कळतं, कोणत्या वेळी काय करायचं आहे ते. संपूर्ण महाराष्ट्रातील जनता योग्य तो निर्णय यावेळी घेणार आहे. काही झालं तरी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात महाराष्ट्रात येणार आहे.
महाराष्ट्रात कोणतीही कायदा सुव्यवस्था उरलेली नाही. सामान्य माणसाला सन्मानाने जगता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे अशी टीकाही पवारांनी यावेळी केली. दरम्यान फलटणसह सातारा जिल्ह्यात वातावरण बदलल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास जयंत पाटील यांनी या वेळी व्यक्त केला.