चिपळूण: राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात अर्थसत्तेची मस्ती गेली आहे. पण लवकरच जनताच तुमची योग्य जागा तुम्हाला दाखवणार आहे, अला टोला खासदार शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. ते चिपळूण येथील सभेत बोलत होते.

शरद पवार यांच्या सोमवारच्या जाहीर सभेतही अभूतपूर्व अशी कार्यकर्त्यांची गर्दी होती. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, बबन कणावजे, माजी आमदार रमेश कदम, राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ लिमये, सरचिटणीस प्रशांत यादव, तसेच राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील सर्व नेते पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

हेही वाचा >>>प्रकल्पस्तांच्या मतांसाठी महायुतीची अखेरची धडपड, गरजेपोटी बांधकामे नियमित करण्याचा अखेर निर्णय

यावेळी शरद पवार म्हणाले की, मी कराड येथून रस्त्यामार्गे कारने येथे आलोय. पण चिपळूण सारखा खराब रस्ता मी देशात कुठेच बघितलेला नाही. मुंबई गोवा महामार्गाची अवस्था देखील अशीच आहे. हे रस्ते बघून माझी मान शरमेने खाली गेली. सबधितांना मी यासंदर्भात सांगणार आहे. कोकणात आल्यावर माझ्या समोर पहिले नाव येते ते पी. के. सावंत यांचे, प्रचंड मोठं व्यक्तिमत्त्व होतं. तसेच नाना जोशी, बाळासाहेब माटे, गोविंदराव निकम या सर्वांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले. आता नंतरच्या काळात रमेश कदम, राजाभाऊ लिमये यांनी देखील कोकणात पक्षासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. आता प्रशांत यादव यांचे नाव घ्यावे लागेल. त्याचे काम आणि आजचा जनसमुदाय बघितल्यानंतर आपण सर्वांनी आता प्रशांत यादव यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. आताच्या पिढीत असा प्रामाणिकपणा राहिलेला नाही. आताची पिढी सत्तेच्या पाठी धावत सुटली आहे, असा टोला ही पवार यांनी आमदार शेखर निकम यांना लगावला.