लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘एक देश एक निवडणूक’ असावी, अशी भूमिका मांडत असतानाच जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणूक जाहीर केली जाते आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नंतर होईल असे सांगितले जाते. यातून पंतप्रधानांच्या बोलण्यातील विरोधाभास प्रकट होतो, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली.
ते शनिवारी नागपूर येथील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात संपूर्ण देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याची कल्पना मांडली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुका जाहीर झाल्या. पण झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर झाल्या नाहीत. याबद्दल अधिक स्पष्टीकरण अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाल्याशिवाय पंतप्रधानांच्या घोषणेला योग्य कसे समजायचे, असा प्रश्नही पवारांनी उपस्थित केला.बांगलादेशातील घटनांची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी उमटली आहे. मात्र महाराष्ट्रात त्याचे विशेष परिणाम दिसत नाहीत, असेही पवार यांनी सांगितले.