नगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये झालेल्या सत्ताबदलानंतर बँकेच्या कारभाराविषयीच्या चर्चा तशा थंडावल्या होत्या. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे नगर जिल्हा बँकेच्या कारभाराविषयी शंका घेणारे वक्तव्य केले. त्यानंतर लगेचच नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्यांनी बँकेच्या कारभाराबाबत आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात झालेल्या सत्तांतराच्या काही दिवस आधीच नगर जिल्हा बँकेत सत्तांतर घडले. आताही विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच जिल्हा बँकेच्या कारभाराबद्दल शरद पवार गट आक्रमक भूमिका स्वीकारताना दिसतो आहे. जिल्ह्याच्या सहकारात काँग्रेस-थोरात गटाने सातत्याने शरद पवार गटाला साथ दिलेली आहे. त्यामुळे लवकरच थोरात गटाचे संचालकही आक्रमक भूमिका स्विकारताना दिसतील, असा होरा व्यक्त केला जातो. गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये थोरात व राष्ट्रवादीच्या (एकत्रित) ताब्यात असलेली जिल्हा बँक भाजप नेते तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी हिसकावली आणि बँकेच्या इतिहासात प्रथमच भाजपकडे अध्यक्षपद आले. विशेष म्हणजे थोरात-राष्ट्रवादीचे बहुमत असूनही हे सत्तांतर घडले. आता राज्यातील सत्ता समीकरणानुसार भाजप व अजितदादा गट बँकेत बहुमतात आहे आणि शरद पवार गट आक्रमक भूमिका घेऊ लागला आहे.
आणखी वाचा-Mumbai Assembly Elections 2024 : विधानसभेचे पूर्वरंग: मुंबई कोणाची? महायुती की महाविकास आघाडीची
उदय शेळके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर अध्यक्षपदाची निवड होत असतानाच बँकेत सत्तांतर झाले. शेळके हे जीएस महानगर बँकेचेही अध्यक्ष होते. महानगर बँकेने आयोजित केलेल्या मुंबईतील कार्यक्रमास शरद पवार व बाळासाहेब थोरात हे दोघेही उपस्थित होते. त्याचवेळी पवार यांनी, जिल्हा सहकारी बँकेची आता काळजी वाटायला लागली आहे, आज तेथे कशी आणि कोणती लोक बसलीत? त्यावर भाष्य न केलेले बरं, तिथे काय शिजतं आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे, अशी टिप्पणी केली आणि त्यानंतर लगेचच पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस तथा केदारेश्वर साखर कारखान्याचे सर्वेसर्वा प्रताप ढाकणे यांनी आशिया खंडात नावजलेली जिल्हा बँक डबघाईला आल्याचा हल्ला चढवला. खासदार नीलेश लंके यांनीही बँकेच्या नोकरभरती प्रक्रियेवर आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली. याच गटाचे आमदार प्राजक्ता तनपुरे यांनीही बँकेच्या कारभारावर आरोप केले.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी या सर्व आक्षेपांना उत्तर देणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र त्यात साखर कारखान्यांना मर्यादा डावलून केलेल्या कर्जवाटपाच्या चौकशीचा उल्लेख वा स्पष्टीकरण नाही. जिल्हा बँकेची वार्षिक सभा शुक्रवारी (दि. २७) होत आहे, त्यामुळे सभेपूर्वीच ती गाजू लागली आहे. सभेत या सर्व कारभाराचा ऊहापोह करण्यासाठी शरद पवार गटाचा प्रयत्न दिसतो. बँकेच्या संगणक प्रणाली खरेदीला हाणून पाडत बाळासाहेब थोरात-शरद पवार गटाने यापूर्वी विखे-कर्डिले गटाला धक्का दिला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ७०० पदांच्या नोकर भरतीसाठी सुरु केलेल्या प्रक्रियेवरुन पुन्हा कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते.
बँकेत सत्तांतर झाले तेंव्हा शिवाजी कर्डिले अवघ्या एक मताने विजयी झाले मात्र राष्ट्रवादीचे चार तर काँग्रेसचे एक अशी पाच मते फुटली होती. मात्र आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला आहे आणि सत्ताबदलावेळी साथ देणाऱ्या संचालकांच्या भूमिका विखे गटासाठी संदिग्ध ठरू लागल्या आहेत. संगणक प्रणाली खरेदीला लागलेला ‘ब्रेक’ अद्यापि निघालेला नाही. यानिमित्ताने बँकेच्या इतिहासात प्रथमच संचालकांनी सह्यांची मोहीम राबवण्याची घटना घडली होती. या धक्क्यातून विखे-कर्डिले गट अद्याप सावरलेला नाही.
विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच विखे-कर्डिले यांच्या वर्चस्वाखालील जिल्हा बँकेच्या कारभारावर आरोप होऊ लागले आहेत. बहुसंख्य संचालक कोणत्या ना कोणत्या पक्षाकडून विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. अशा परिस्थितीत बँकेच्या कारभारावर होणारे आरोप आणि नोकरभरती प्रक्रियेवर घेतले जाणारे आक्षेप विखे-कर्डिले गटाला अडचण निर्माण करणारे ठरत आहेत.