संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून गेल्या २३ वर्षांत पक्षाला राजधानी मुंबईत कधीच विस्तार करता आलेला नाही. पक्षाने अनेक प्रयोग केले पण त्यात यश आले नाही. यातूनत बहुधा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्वत:च लक्ष घातले आहे. गेल्या आठवडाभरात मुंबईत पक्षाच्या दोन मेळाव्यांना हजेरी लावून नेते आणि कार्यकर्त्यांना नैतिक बळ देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरदर पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी युवा कार्यकर्त्यांच्या मेळाव्या सहभागी झाले होते. गेल्या आठवड्यात चेंबूरमध्ये मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले होते. मुंबईत पक्ष वाढू शकतो, असा विश्वास त्यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना दिला. मुंबई ही कार्यकर्त्यांची खाण आहे. मुंबई बदलत आहे. त्या दृष्टीने राष्ट्रवादीला हे बदल स्वीकारून पुढे जावे लागेल, असा संदेश त्यांनी दिला. मुंबईत पक्ष वाढीला अनुकूल वातावरण असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

हेही वाचा >>> एकाच पक्षाचे गट-तट बारसू प्रकल्पाच्या मुद्यावर आमने-सामने

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाने राज्याच्या विविध भागांमध्ये ताकद वाढविली. सत्तेचा लाभ घेत पक्ष राज्याच्या तळागाळापर्यंत पोहचला. त्याला मुंबई आणि विदर्भ अपवाद ठरला. मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा असून, विदर्भात ६२ जागा आहेत. म्हणजेच ९८ जागांवर राष्ट्रवादी पक्ष अजूनही कमकुवत आहे. या दोन्ही विभागांमध्ये पक्षाला विधानसभा निवडणुकीत मर्यादित यश मिळते. मुंबईत पक्ष वाढीसाठी शरद पवार यांनी यापूर्वीही अनेकदा प्रयत्न केले होते. पण पक्षाची तेवढी वाढ झालेली नाही. महानगरपालिकेत राष्ट्रवादीला दुहेरी आकडा गाठता आलेला नाही.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : “कर्नाटकात सत्ता जाणार असल्याने धार्मिक दंगलींचा बागुलबुवा उभा करतायत”; ठाकरे गटाची भाजपावर टीका

२००९ मध्ये काँग्रेसच्या मदतीने लोकसभेत ईशान्य मुंबईची जागा जिंकली होती. विधानसभेतही आकडा दोन-चारच्या वर कधी गेला नाही. छगन भुजबळ, सचिन अहिर, संजय पाटील, नवाब मलिक या नेत्यांकडे मुंबईची धुरा सोपविण्यात आली होती. पण यापैकी कोणत्याच नेत्याला मुंबईत राष्ट्रवादीची ताकद वाढविता आली नाही. पक्ष मर्यादित स्वरुपातच वाढला. काही वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या मेळाव्यात शरद पवार यांनी राज्यात राष्ट्रवादीला चांगला पाठिंबा मिळत असताना मुंबई मागे राहिल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. अजित पवार यांनी मुंबईत वाढ खुंटल्याबद्दल थेट शहरातील नेत्यांनाच दोष दिला होता.

हेही वाचा >>> भंडाऱ्यात भाजप आणि राष्ट्रवादीची युती

मुंबईत झोपडपट्टीवासीय, दलित, अल्पसंख्याक, बिगर मराठी भाषकांची मते महत्त्वाची असतात. राष्ट्रवादीला मुंबईत हक्काची मतपेढी तयार करता आलेली नाही. गृहखाते वर्षानुवर्षे राष्ट्रवादीकडे असतानाही मुंबईत राष्ट्रवादीला बळ मिळाले नव्हते. सर्व समाजाचा विश्वास संपादन करण्यात राष्ट्रवादीला यश आले नाही. मुंबईतील मराठी मतदार हे शिवसेना, भाजप, काँग्रेस किंवा मनसेला मतदान करतात. मुंबईत राष्ट्रवादीला तेवढे मतदान होत नाही. अमराठी मतेही फारशी मिळत नाहीत. मुंबईतील अल्पसंख्याक समाजात राष्ट्रवादीबद्दल कधीच आपुलकीची भावना नव्हती. यामुळेच मुंबईत राष्ट्रवादी तेवढे बाळसे धरू शकले नाही, अशी खंत पक्षाच्या एका नेत्याने व्यक्त केली.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शिवसेनेबरोबर युती करून लढणार आहे. काँग्रेस सोबत येण्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. शिवसेनेच्या ताकदीचा फायदा करून घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असेल. महापालिका निवडणुकी कधी होतील याबाबत स्पष्टता काहीच नाही पण पक्षाचा जनाधार वाढावा म्हणून शरद पवार यांनी आतापासून लक्ष घातला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar himself focused on party growth in mumbai print politics news ysh
Show comments