बिपीन देशपांडे
औरंगाबाद : सत्ता गेली की जनसंपर्क हा मंत्र घेऊन मराठवाड्याच्या दौऱ्यात शरद पवार यांनी पुन्हा साखरपेरणी केली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या स्नेह्याच्या वतीने आयोजित सांगीतिक कार्यक्रमात सहभागी होत फडणवीस वगळता अन्य सर्व भाजप नेत्यांशी चांगले संबंध असल्याचा संदेशही त्यांनी दौऱ्यातून दिला. वाचनालयाच्या भेटीसह त्यांनी औरंगाबाद शहरातील कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन करताना ‘लढत रहा’ चा संदेश त्यांनी आवर्जून दिला. दौऱ्यातील साखर पेरणी आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारी ठरली.
वेळ देत नाहीत, असे कारण देत शिवसेनेत बंड झाल्याने या वेळी शरद पवारांचा दौरा कार्यकर्त्यांना वेळ देणारा होता. असेही नेमकेपणाने ऐकून घेणारे पवार या वेळी अधिक सजगपणे विचारपूस करत होते. अगदी पत्रकार बैठकीतही त्यांनी जरासा अधिक वेळ देत पत्रकारांच्या प्रश्नांना मोकळेपणाने उत्तर दिले.
पत्रकार बैठकीत संवाद करू असे म्हणत पवार यांनी ‘आज तुम्ही बोलायचे मी ऐकतो. किंवा परस्परांच्या माहितीचे आदान-प्रदान करू’ असे म्हणत संवादास सुरुवात केली. ‘तुम्ही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत का उतरला नाहीत?’ या प्रश्नावर पवार यांनी पत्रकारांनाच मिश्किलपणे ‘तुम्हाला माझी महाराष्ट्रात अडचण वाटते का’ असे विचारले. आपण केलेली बंडखोरी, अजित पवारांचे बंड आणि शिवसेनेतील बंडाळी, राज्य-देशापुढील आव्हाने, सहकार, न्याय संस्थांमधील निर्णय प्रक्रिया, राज्यातील शिंदेशाही सरकारचे भवितव्य, आवडत्या सहकार क्षेत्रातील साखर कारखानदारी, सांगली-कोल्हापुरातील पुराचे पाणी मराठवाड्यात वळवण्यासारख्या नव्या सरकारच्या निर्णयासह पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे बाहेरून घेतलेले दर्शन आणि आषाढी एकादशी केली का या प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरे दिली.
देशात अनेक प्रश्नांवर विराेधकांची एकजूट दिसत नसल्याचे एक आव्हान समाेर असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. तसेच श्रीलंकेतील राजकीय अराजकतेमधून, ‘सत्ता एकाच कुटुंबात एकवटल्याचे कारण देताना शेजारचा देश म्हणून भारतालाही त्यापासून काही शिकण्याची गरज असल्याचेही त्यांनी सूचित केले. पंतप्रधान देशातील अनेक घटनांवर कधीच बाेलत नसल्याचे सांगून भाजपमध्येही ठरावीक सत्ताकेंद्र तयार झाल्याकडे अंगुलीनिर्देश केला. एखादा पक्ष फाेडून सत्ता हस्तगत करण्यासारख्या प्रकारातून लाेकशाहीच्या संस्थाच उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू असल्याचे सांगत पवार यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
पाहा व्हिडीओ –
दुसऱ्या दिवशी पवार यांनी आंबेडकर वाचनालयास भेट देऊन वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या सुवर्ण महाेत्सवानिमित्त आयाेजित कार्यक्रमाला हजेरी लावली. शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्यांची माहिती घेऊन त्याविषयी उपाययाेजनेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगून मराठवाड्यातील अनेक प्रमुख शिक्षण संस्थांच्या प्रमुखांच्या पाठीशी उभे राहण्याचा विश्वास दिला. कार्यकर्त्यांशी संवाद साधत पवार यांनी साखरपेरणी केली.