महेश सरलष्कर
नवी दिल्ली राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने बिगरभाजप विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न होत असून संभाव्य महाआघाडीचे नेतृत्व आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याकडे येऊ लागल्याचे दिल्लीतील बैठकीत स्पष्ट झाले. या बैठकीच्या ममता समन्वयक होत्या तर, बैठकीचे अध्यक्षस्थान पवारांनी भूषवले होते.
काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डाव्या पक्षांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांना विनंती केली होती, त्याचा पवार सकारात्मक विचार करत होते. पण, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी पक्षाच्या बैठकीत पवारांना उमेदवारीपासून परावृत्त केल्याचे सांगितले जाते. या निवडणुकीत पराभव झाला तर पवारांचे राष्ट्रीय स्तरावरील राजकारण संपुष्टात येईल अशी शंका व्यक्त करण्यात आली. त्यानंतर पवारांनी उमेदवारीसाठी नकार दिल्याचे विरोधी पक्षांच्या बैठकीच्या आयोजनात सहभागी झालेल्या सदस्यांचे म्हणणे आहे. पवार राष्ट्रपती पदाचे उमेदवार नसले तरी, काँग्रेससह अन्य भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्यात मोठी भूमिका घेत असल्याचे दिसते. विरोधकांचा उमेदवार ठरवताना काँग्रेसने पुढाकार घेतला नव्हता पण, त्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या ‘’मध्यस्थी’’ला पवारांचा पाठिंबा असल्याचे समजते. विरोधकांचा संयुक्त उमेदवार शरद पवार व मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केल्यानंतर निश्चित केला जाणार आहे.
‘’राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीच नव्हे तर, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही विचार केला पाहिजे. त्यासाठी विरोधी पक्षांची बैठक महत्त्वाची आहे‘’, असे ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दिल्लीत झालेल्या १६ विरोधी पक्षनेत्यांचा बैठकीत बोलून दाखवले. या बैठकीपूर्वी माकपचे महासचिव सीताराम येचुरी व भाकपचे नेते डी. राजा यांनी पवारांची भेट घेतली होती. या दोन्ही डाव्या पक्षांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. तृणमूल काँग्रेस आणि डावे पक्ष यांचा एकमेकांना राजकीय विरोध असला तरी, ममतांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल डाव्या पक्षांच्या प्रतिनिधींनी कौतुक केल्याचे सांगितले जाते. पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला हेही उपस्थित होते. ‘’ एकमेकांचे विरोधक असतानाही काश्मीरमध्ये पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्र (गुपकर करार) आले. मग, तुम्हाला (काँग्रेस व प्रादेशिक पक्ष) एकत्र येण्यामध्ये कोणती अडचण आहे’’, असा प्रश्न मुफ्ती यांनी बैठकीत विचारल्याचे समजते.
Presidential Election : विरोधी पक्षांच्या बैठकीपासून दूर राहण्याची ‘आप’ ची तीन कारणे
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर, ममता बॅनर्जी यांनी दिल्ली आणि मुंबईचा दौरा करून विरोधी पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधला होता. त्यावर काँग्रेसने उघड नाराजी व्यक्त केली होती. पण, बुधवारी झालेल्या बैठकीत सहभागी होऊन भाजपविरोधातील संभाव्य महाआघाडीला खीळ बसणार नाही, याची दक्षता काँग्रेस घेताना दिसत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतरही विरोधी पक्षांचा एकमेकांमध्ये संवाद राहावा यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी विविध राज्यांमध्ये बैठका आयोजित केल्या जाण्याची शक्यता आहे. पहिली बैठक मुंबई घेतली जावी व महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी बैठकीचे आयोजन करावे, असा विचार दिल्लीतील बैठकीत ममता बॅनर्जी यांनी मांडला असल्याचे समजते. त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी बैठकांच्या फेऱ्या घेण्याचाही विचार केला जाऊ शकतो. या बैठकांना विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सहभागी व्हावे यासाठी पवार आणि ममता यांचे राजकीय कौशल्य आणि कसब उपयोगी पडू शकते.