पुणे : राज्यातील किंबहुना जिल्ह्यातील राजकारणाची सूत्रे हाती आल्यानंतर अजित पवार यांनी पक्षाअंतर्गत तसेच विरोधकांसाठी घेतलेल्या टोकाच्या भूमिकेचे पडसाद आता जिल्ह्यातील राजकारणात दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातूनच बारामती लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांनी थेट अजित पवार यांच्याविरोधात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विरोधाची भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे.
इंदापूरचे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील, शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी थेट अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. तर बदलत्या राजकीय परिस्थितीत शरद पवार यांचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव, काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी शरद पवार यांच्याबरोबर जमवून घेण्याची भूमिका घेतली आहे. कट्टर विरोधक असतानाही जमेची बाजू लक्षात घेऊन शरद पवार यांनी केलेले बेरजेचे राजकारण अजित पवार यांना अडचणीत आणण्यास उपयुक्त ठरत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळेच बारामतीची लढाई अजित पवार यांच्यासाठी काहीशी अवघड ठरणार आहे.
हेही वाचा : ममता बॅनर्जी विश्वासघातकी; काँग्रेसची टीका
राज्यातील राजकीय नाट्यानंतर शरद पवार आणि अजित पवार या दोघांसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. पवार कुटुंबीयातील अंतर्गत वाद पुढे येत असतानाच अजित पवार सत्तेत असलेल्या जिल्ह्यातील महायुतीमध्येही सारेकाही अलबेल आहे, असे चित्र नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या इंदापूर, पुरंदर आणि बारामती विधानसभा मतदारसंघातमध्ये नानाविध घडामोडी घडत असून अजित पवार यांना महायुतीमधील त्यांच्या विरोधकांनी घेरले असल्याचे चित्र आहे. इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील आणि पवार कुटुंबीयांचे राजकीय वैर आहे. अजित पवार सत्तेमध्ये आल्यानंतर आणि बारामती लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी चंग बांधल्यानंतर हर्षवर्धन यांनी त्यांना विरोध सुरू केला. विश्वासात घेतले जाणार नसेल तर साथ दिली जाणार नाही, अशी भूमिका हर्षवर्धन यांची कन्या अंकिता यांनी घेतली. हा वाद सुरू असतानाच थोपटे कुटुंबीयांची खासदार सुप्रिया सुळे आणि संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांनी घेतलेली भेट राजकीय चर्चेचा विषय ठरली. त्यानंतर विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांनी सुळे उपस्थित असलेल्या मेळाव्याला उपस्थित राहून सुळे यांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. तसेच शरद पवार यांच्यासमवेतही खेडशिवापूर येथील मेळाव्यात सुळे यांना हात दिला जाईल, असे जाहीर केले. तर पुरंदरचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबीयांबाबत जाहीर मतप्रदर्शन करून बारामती कोणाचा सातबारा नाही, असे सांगत बारामतीच्या मैदानात उतरण्याची भाषा केली. या बदलत्या राजकीय परिस्थितीमागे शरद पवार यांचे राजकीय कौशल्य असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा, तर नायब सिंह सैनी नवे मुख्यमंत्री; हरियाणात नक्की काय घडतंय?
पुरंदर, भोर आणि इंदापूर विधानसभा मतदासंघ खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी मताधिक्याच्या निमित्ताने कायम अडचणीचे ठरले आहेत. मात्र याच मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांनी सत्तेत असलेल्या अजित पवार यांच्याविरोधात भूमिका घेतल्याने तर्क-वितर्क सुरू झाले असून यामागे शरद पवार यांचे बेरजेचे राजकारण असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : उत्तर महाराष्ट्रातील निस्तेज काँग्रेसला राहुल गांधी यांच्या यात्रेचा फायदा होणार का ?
केंद्रीय मंत्री झाल्यानंतर शरद पवार राज्यातील राजकारणापेक्षा राष्ट्रीय राजकारणातच रमले आणि स्वाभाविकच राज्यातील राजकारण अजित पवार यांच्या हाती आले. कट्टर विरोधक असतानाही शरद पवार यांनी सर्वसमावेशक राजकारण केले. ते अजित पवार यांना जमले नाही. पक्ष वाढविताना त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांबरोबरच अन्य पक्षातील विरोधकांबाबतही टोकाची भूमिका घेतली. त्यामुळे अनेक नेत्यांचा रोषही ओढावून घेतला. अजित पवार सत्तेत आल्यानंतर आणि बारामतीमध्ये त्यांचा उमेदावर आला तर, राजकीय अस्तित्वच संपले, या हेतूने अजित पवार यांचे विरोधक एकत्र आले असल्याचे दिसत आहे. त्यातून आगामी निवडणुकीतील त्यांचे राजकीय महत्व वाढविण्याचाही प्रयत्न त्यांनी सुरू केला असल्याची वस्तुस्थिती आहे. ही सर्व बाब लक्षात घेऊन शरद पवार त्यांच्या एकेकाळच्या विरोधकांना बळ देत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी पुढील लढाई अवघड झाल्याचे बोलले जात आहे.