संतोष प्रधान
राज्यात निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्याची क्षमता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला असला तरी मुंबई आणि विदर्भात कमकुवत पक्ष संघटना, पक्षाच्या स्थापनेपासून गेल्या २३ वर्षांत राष्ट्रवादीला सर्व समाज घटकांचा पाठिंबा मिळविण्यात आलेली अडचण, पक्षाच्या एकूण मर्यादा लक्षात घेता ही पोकळी भरून काढणे राष्ट्रवादीसाठी आव्हानात्मक असेल.
हेही वाचा >>>कोकणातील शिवसेनेच्या आमदारांभोवती कारवाईचा फास, ठाकरे गटाला शह देण्याकरिता शिंदे-भाजपची योजना
राष्ट्रवादी काँग्रेच्या प्रदेश कार्यकारिणीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत बोलताना पवार यांनी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पोकळी भरून काढण्यासाठी संधी असल्याचे निदर्शनास आणून दिले. राजकारणात वेळोवेळी पोकळी निर्माण होते. गुजरातची पोकळी भाजपने भरून काढली. दिल्लीतील राजकीय पोकळी आम आदमी पार्टीने भरून काढली. महाराष्ट्रात ही संधी राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. आज अनेकांना बदल हवा आहे. या पार्श्वभूमीवर पोकळी भरून काढण्याकरिता कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन आवश्यक असे कार्यक्रम घेतले तर त्याचा पक्षाला नक्कीच फायदा होईल. राज्यात पर्याय देण्याची ताकद ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असल्याचेही पवारांनी अधोरेखित केले. १७ डिसेंबरच्या आंदोलनासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला होता. अन्य घटक पक्षांनी राष्ट्रवादीने मांडलेला कार्यक्रम मान्य केला. राजकीय पोकळी भरून काढण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करीत आहे, असेही पवार यांनी सांगितले.
हेही वाचा >>>सोलापुरात क्षीण झालेल्या काँग्रेसची पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदेंवर आशा
राजकीय पोकळी भरून काढण्याची ताकद राष्ट्रवादीत असल्याचे पवार म्हणाले असले तरी पक्षासाठी हे सोपे नाही. गेल्या २३ वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याच्या सर्व भागांमध्ये मजबूतीने अद्यापही उभा राहू शकलेला नाही. मुंबईत पक्षाला अजूनही बाळसे धरता आलेले नाही. मुंबईत नगरसेवकांच्या संख्येचा दुहेरी आकडा गाठता आलेला नाही. आमदारांची संख्याही कधी लक्षणिय नव्हती. विदर्भातही परिस्थिती वेगळी नाही. प्रफुल्ल पटेल, अनिल देशमुख, डॉ. राजेंद्र शिंगणे, मनोहर नाईक, संजय खोडके आदी काही नेत्यांनी आपापल्या भागांमध्ये पक्षाची ताकद वाढविली. पण विदर्भात राष्ट्रवादीला अद्यापही जनाधार मिळू शकलेला नाही. लोकशाही आघाडी सरकारमध्ये विदर्भाच्या वाट्याचा निधी पश्चिम महाराष्ट्रात वळविण्यात आल्याचा आरोप झाला होता. त्याचे सारे खापर हे राष्ट्रवादीवर फुटले होते. राष्ट्रवादीच्या जनतेने राष्ट्रवादीला कधीच पूर्ण क्षमतेने ताकद दिलेली नाही. मुंबई आणि विदर्भात विधानसभेच्या एकूण ९८ जागा आहेत. या दोन्ही पट्ट्यांमध्ये कितीही प्रयत्न करूनही राष्ट्रवादीची ताकद वाढलेली नाही.
हेही वाचा >>>पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विकासकामांच्या श्रेयवादाची लढाई
राष्ट्रवादीवर जातीयतेचा बसलेला शिक्का कितीही प्रयत्न केले तरी पुसला जात नाही. मराठा समाजाला पक्षाकडून नेहमीच बळ देण्यात आले. मध्यंतरी मराठा समाजाचे मोठाले मोर्चे राज्यात निघाले. त्याला राष्ट्रवादीने ताकद दिल्याची चर्चा होती. याची अन्य मार्गाने प्रतिक्रििया उमटली. इतर मागासवर्गीय समाजात राष्ट्रवादीबद्दल वेगळी प्रतिमा तयार झाली. अल्पसंख्यांक समाजातही राष्ट्रवादीबद्दल संशयाचे वातावरण असते. भाजप वा काँग्रेसला सर्व समाज घटकांचा पाठिंबा मिळतो. राष्ट्रवादीला अजून तरी ते शक्य झालेले नाही.
गुजरातमध्ये भाजप किंवा दिल्लीत आपने पोकळी भरून काढली, असे पवार यांनी नमूद केले. गुजरातमध्ये २७ वर्षे सत्तेत असूनही जनतेचा विश्वास संपादन करण्यात भाजपला यश आले. आरोग्य, शिक्षण, मोहल्ला समित्या या माध्यमातून आम आदमी पार्टीने गोरगरीब तसेच समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा दिल्लीत मिळविला. पक्षाच्या स्थापनेपासून १७ वर्षे सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला गुजरातमध्ये भाजप किंवा दिल्लीत आपला जे जमले ते राज्यात शक्य झाले नाही.
काँग्रेस कमकुवत झाल्याचा फायदा उठवित ही पोकळी भरून काढण्याचा पवारांचा प्रयत्न आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला पीछाडीवर टाकले. पण मतांचे गणित जुळण्याकरिता राष्ट्रवादीला लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची मदत लागते. हे सारे घटक लक्षात घेता खरोखरीच राजकीय पोकळी भरून काढण्याकरिता राष्ट्रवादीला मोठा पल्ला गाठवा लागेल.