दयानंद लिपारे
कोल्हापूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे दोन ज्येष्ठ नेते एकाच वेळी कोल्हापूर दौऱ्यावर आले. त्यांचे कार्यक्रम अराजकीय स्वरूपाचे असले तरी त्यातून आगामी राजकारणाची आणि निवडणुकीची बांधणी करण्याचा प्रयत्न केला. यानिमित्ताने कोल्हापूरच्या राजकीय सारीपटावरील हालचाली वाढल्या आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरू झाले आहे. केंद्रातील भाजप सरकारने पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना मुक्कामी दौऱ्यावर पाठवायला सुरुवात केली आहे. कोल्हापूरात आजवर केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री एस.पी. सिंग बघेल बघेल, केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोष आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे दौरे झाले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी तर जणू भाजपचे कोल्हापूरचे राजकीय पालकत्व स्वीकारले असल्यासारखा वावर सुरु ठेवला आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी निवडणुकीची मोट बांधायला सुरुवात केली आहे. यामुळे जिल्ह्यातील बड्या नेत्यांचे दौरे वाढले आहेत.
हेही वाचा… भांडी, कुंडी, साडीच्या माध्यमातून महिला मतांची पेरणी
विकासकामातून राजकीय बांधणी
भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे दौरे या पार्श्वभूमीवर उल्लेखनीय ठरले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा होता. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग, कोल्हापुरात प्रवेशासाठी १८० कोटीच्या उड्डाणपूल आणि दीर्घकाळ रेंगाळलेल्या कोल्हापूर – सांगली या रस्त्याचे ८४० कोटी रुपये खर्चाच्या चौपदरीकरण कामाचे भूमिपूजन केले. या निमित्ताने कोल्हापूरचे दळणवळण सुधारणार आहे. महापूर काळात कोल्हापूर शहर पंचगंगेच्या विळख्यात अडकलेले असते. उड्डाण पुलामुळे हि अडचण दूर होण्याची शक्यता आहे. याद्वारे कोल्हापूरच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न गडकरी यांनी केला आहे. विकासाकामातून जनमत तयार करण्याचा हा भाजपचा प्रयत्न. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ही कामे लाभदायक कसे ठरू शकतील याचे गणित भाजपमधून मांडले जात आहे.
हेही वाचा… ना आढावा ना चर्चा, मुख्यमंत्र्यांचा मराठवाडा दौरा केवळ सत्संगासाठी?
खासदारांचे मनोमिलन ?
कोल्हापूर प्रवेशासाठी उड्डाणपूल (बास्केट ब्रिज) या कामासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी प्रयत्न केले. या कामाचा प्रारंभ होत असताना मंचावर उपस्थित असलेले त्यांचे पूर्वीचे राजकीय प्रतिस्पर्धी शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी ‘ लोकसभेचे विरोधी उमेदवार म्हणून बास्केट ब्रिजची खिल्ली उडवली होती ‘ अशी कबुली उघडपणे दिली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मंडलिक यांना महाडिक यांच्या मदतीची गरज लागणार आहे. निवडणुकीवर नजर ठेवून केलेले हे भाष्य त्यांना प्रत्यक्ष निवडणुकीवेळी कितपत उपयुक्त ठरणार याची प्रतीक्षा असेल. पण यातून मंडलिक – महाडिक यांचे राजकीय मैत्रीचा पूल जुळताना पाहायला मिळाला.
हेही वाचा… ठाकरेंना ‘हिरे’ गवसल्याने शिंदे गटात अस्वस्थता
पवारांचे बेरजेचे राजकारण
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे कोल्हापूर जिल्ह्याचे दौरे वाढत चालले आहेत. पंधरवड्यात त्यांचा दुसऱ्यांदा कोल्हापूर दौरा झाला. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपतराव पवार यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभ पवार यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमातून पवार यांनी बेरजेच्या राजकारणावर भर दिला. आगामी निवडणुकीला सामोरे जात असताना सर्व विरोधी घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न असल्याचे पवार यांनी पत्रकार परिषद सांगितले होते. त्याचे अनुकरण त्यांनी शेकापच्या कार्यक्रमाला हजेरी लावून केले. छोटे आणि समविचारी पक्ष एकत्रित करण्याची पवार यांची रणनीती यातून दिसून आली. पवार यांनी छोट्या पक्षांना जवळ करत असताना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संपतराव पवार यांच्या पुत्रास पराभवास सामोरे जावे लागल्याचे शल्य शेकापचे सरचिटणीस, आमदार जयंत पाटील यांनी बोलून दाखवताना त्यांनी जिल्हातील कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या नेतृत्वास खडे बोल सुनावत किमान यापुढे तरी राजकीय प्रवाहात सामावून घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. संपतराव पवार यांना अपेक्षित असणाऱ्या खत कारखान्याच्या बाबतीत पवार यांची भूमिका बेरजेच्या राजकारणाची होणारे की केवळ घोषणेची; याचाही प्रत्यय येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या सर्वेक्षणाच्या आकड्यांनी पवार यांची खळी खुलली असल्याचे दिसले. या प्रश्नावर उत्साहाने बोलत असताना विरोधकांची ताकद वाढणार असल्याचे ते आत्मविश्वासपूर्वक सांगत राहिले. पवार यांच्या पत्रकार परिषदेला सलग दुसऱ्यांदा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी लावलेली हजेरी नजरेत भरणारी होती. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण या जागा टिकवण्यासाठी त्यांना राष्ट्रवादीची गरज लागणार असल्याचे त्यांच्या हालचालीतून अधोरेखित राहिले. त्यांचेही हे पावूल बेरेजेचे गणित साधणारे ठरले.