नागालँडमध्ये विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीत एनडीपीपी पक्षाचा २५, तर भाजपाचा १२ जागांवर विजय झाला आहे. या विजयामुळे एनडीपीपी-भाजपा यांचे सरकार नागालँडमध्ये स्थापन झाले आहे. एनडीपीपीचे नेते नेफ्यू रियो यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, येथे एनडीपीपी आणि भाजपाचे युती सरकार स्थापन झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसनेही या सरकारला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
हेही वाचा >> समाजवादी पक्ष ‘अमेठी’ लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविणार; काँग्रेसशी आघाडीची शक्यता संपुष्टात?
राष्ट्रवादीच्या आमदारांची सरकारमध्ये सामील होण्याची इच्छा
महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका बजावतो आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील राष्ट्रीय पातळीवर भाजपाविरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असतानाच राष्ट्रवादीने नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजपा सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजपा सत्तेत आहेत. त्यामुळे सात आमदार असल्यामुळे राष्ट्रवादी येथे विरोधी पक्षाची भूमिका बजावेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र राष्ट्रवादीने येथे सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा >> ‘भारतातील लोकशाही धोक्यात,’ राहुल गांधींचे लंडनमध्ये विधान; भाजपाची सडकून टीका
व्यापक हित लक्षात घेऊन निर्णय
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे ईशान्य भारताचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी सांगितले आहे. “नवनियुक्त आमदार तसेच राष्ट्रवादीच्या नागालँड युनिटने सरकारमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या सरकारचे नेतृत्व रियो करत आहेत. रियो यांच्याशी असलेल्या सलोख्याच्या संबंधामुळे त्यांना पाठिंबा द्यावा, असे आम्हाला वाटते; अशी भूमिका नागालँडच्या राष्ट्रवादी युनिटने घेतली होती. याबाबतचा अंतिम निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हेच घेणार होते. मंगळवारी त्यांनी नागालँडमधील नवनिर्वाचित आमदार आणि स्थानिक राष्ट्रवादी युनिटची मागणी मान्य केली आहे. नागालँडचे व्यापक हित लक्षात घेऊन, त्यांनी हा निर्णय घेतला आहे,” असे नरेंद्र वर्मा यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा >> समाजवादी पक्ष ‘अमेठी’ लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविणार; काँग्रेसशी आघाडीची शक्यता संपुष्टात?
सकारमध्ये स्थान मिळणार का? अद्याप अस्पष्ट
दरम्यान, नागालँडमध्ये एनपीपी, एनपीएफ, लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), जनता दल (युनायटेड) या सर्वच पक्षांनी एनडीपीपी-भाजपा सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीनेही सरकारला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यामुळे नागालँडमध्ये विरोधी पक्षच न राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी पक्षाने सरकारला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली असली, तरी एनडीपीपी-भाजपाने ते इतर पक्षांना सरकारमध्ये घेणार की नाही, याबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही. नवे मंत्रिमंडळ यावर निर्णय घेणार आहे.