पुणे/ बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघातील पवार विरुद्ध पवार लढतीच्या दुसऱ्या अंकाची सोमवारी झालेली सुरुवात मंगळवारी ‘घर कोणी फोडले,’ या प्रसंगापर्यंत आली आहे. ही निवडणूक आता मतदारांच्या भावनिकतेभोवती फिरणार असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घर फोडल्याच्या आरोपाला उत्तर देताना जाहीर सभेत केलेली टीका आणि दादांच्या सोमवारच्या सभेत घडलेल्या अश्रू पुसण्याच्या प्रसंगाची उडविलेली खिल्ली, हे याचेच सूचन असल्याचे मानले जाते.
‘कुुटंबातील वडीलधारी म्हणून कुटुंबातील सगळे माझे ऐकतात. घर कसे एकत्र राहील, हीच भूमिका मी नेहमी घेतली. मात्र मी घर फोडल्याची भाषा बारामतीमध्ये झाली. घर फोडायचे माझ्या आई-वडिलांनी, भावांनी मला कधी शिकवले नाही. भावांनी शेती, उद्याोग सांभाळल्यानेच मी राजकारण करू शकलो,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी अजित पवार यांच्या आरोपाला उत्तर दिले.
हेही वाचा :RSS-BJP Relation: संघ-भाजपचे सूर पुन्हा जुळले; महाराष्ट्र, झारखंडमध्ये हरियाणाची पुनरावृत्ती होणार?
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची सुरुवात कण्हेरी येथून झाली. त्या वेळी आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. ‘माझ्या विरोधात उमेदवार देऊ नये, असे आईने सांगितले होते. मात्र तरीही त्यांनी अर्ज भरला. कोणाच्या सांगण्यावरून अर्ज भरला असे विचारले, तर ‘साहेबां’नी सांगितले, असे उत्तर पुढे आले. मग ही चूक कोणी केली? त्यामुळे तात्यासाहेबांचे घर फोडण्याचे काम तुम्ही केले, असे समजायचे का,’ असा सवाल अजित पवार यांनी सोमवारी बारामती येथील सभेत केला होता. त्या वेळी अजित पवार भावनिकही झाले होते. त्याला शरद पवार यांनी थेट उत्तर दिले.
‘सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक झाली. सुप्रियाच्या विरोधात सुनेत्रा यांना उभे करण्यात आले. त्या वेळी त्यांची भाषणे पाहा. समोरचे लोक भावनेला हात घालतील. तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. डोळ्यांत पाणी आणून मते द्या, अशी विनवणी करतील. मात्र तुम्ही बळी पडू नका, असे त्यांनी सांगितले.
युगेंद्र पवारांची मालमत्ता ७२ कोटी; कर्ज २२ कोटी!
बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार आणि शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांच्याकडे तब्बल ७२ कोटी रुपयांपेक्षा अधिकची मालमत्ता असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. त्यांच्यावर २२ कोटींचे कर्ज असून, त्यामध्ये वडील श्रीनिवास पवार यांच्याकडून ६ कोटी ८२ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचा उल्लेख आहे.
हेही वाचा :Nagpur Assembly Constituency : गाजावाजा करीत ‘वंचिंत’मध्ये गेलेले अनिस अहमद निवडणुकीपासून वंचित
● एकूण संपत्ती : ७२ कोटी ७७ लाख रुपये ● रोख रक्कम : ३९,४०० रुपये ●बँकांत ठेवी : ३९ कोटी ७९ लाख ९४ हजार २९ रुपये ● जमीन : २ कोटी ३६ लाख ८० हजार ९५१ रुपये किमतीची १३ एकर शेतजमीन.
● सदनिका : मुंबईमध्ये मलबार हिल येथे १० कोटी ७९ लाख ५५ हजार रुपयांची सदनिका ● वाहने : एक हार्वेस्टर, दोन ट्रॅक्टर, दोन मालवाहतूक वाहने.
‘अजित पवारांनी पक्ष पळविला’
शरद पवार म्हणाले, ‘राज्य चालविण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली. गेली २० वर्षे मी बारामतीमध्ये लक्ष घातले नाही. साखर कारखाने, दूध संघ, बँका, खरेदी-विक्री संघाचे सर्वाधिकार त्यांना दिले. सत्ता असताना चार वेळा उपमुख्यमंत्रिपदाची संधी दिली. तरी त्यांनी पहाटे सहा वाजता तिकडे जाऊन शपथ घेतली. त्यानंतर चार दिवसांत पद गेले. गेल्या काही काळात तर ते पक्षच दुसरीकडे घेऊन गेले. पक्ष मी काढला. चिन्ह माझे होते. मात्र त्यांनी पक्ष आणि चिन्ह पळविले. माझ्या आयुष्यात मी कधी न्यायालयात उभा राहिलो नव्हतो. मात्र ती वेळ त्यांनी आणली. पक्षफुटीनंतर मला पहिल्यांदा समन्स बजाविण्यात आले,’ असे भाष्य शरद पवार यांनी पक्षफुटीसंदर्भात केले.
हेही वाचा :कोकण पट्ट्यातील बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न, १२ जिल्हाध्यक्षांसोबत गहलोत यांची चर्चा
‘बारामतीत दारूचे कारखाने आणले नाहीत’
‘बारामतीचा विकास सांगितला जातो. मात्र तो सर्वांच्या सहभागातून होतो. बारामतीसह जेजुरी, इंदापूरला एमआयडीसी आणली. शेती आणि दूध उत्पादनाशी संबंधित कंपन्या आल्या. डायनामिक्स डेअरीचे चॉकलेट जगभर ‘मेड इन बारामती’ म्हणून पोहोचविले. आमचा एक गडी मात्र फॉरेनचा माल येथे आणतो आहे. आम्ही कधी दारूचा कारखाना काढला नाही आणि बारामतीमध्ये मलिदा गँगही निर्माण केली नाही,’ अशी टीका शरद पवार यांनी केली.