राहाता : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या शिर्डी येथे झालेल्या शिबिरात पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणशिंग फुंकले असून निष्ठावान कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागण्याची आवाहन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर प्रथमच होत असलेल्या या शिबिरावर त्याचे सावट स्पष्टपणे कार्यकर्त्यांमध्ये जाणवत होते. कार्यकर्त्यांना या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी शिबिराचा उपयोग करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना मागील वर्षीही शिर्डी येथीलच साई पालखी निवारा येथे शिबिर झाले होते. या शिबिरात शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी दांडी मारली होती. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीतरी गडबड होण्याचे संकेत मिळाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीच्या सावटानंतर शरद पवार गटाच्या निष्ठावान कार्यकर्त्याचे शिबिर याच ठिकाणी दोन दिवस संपन्न झाले. ‘ज्योत निष्ठेची लोकशाही संरक्षणाची’ शिर्षकाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरालाही पक्षाचे आ. रोहित पवार यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. त्यांच्या अनुपस्थितीची वेगवेगळी कारणे पक्षाच्या नेत्यांकडून पुढे केली जात होती. आमदार रोहित पवार यांचे पक्षांतर्गत नेतृत्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच पक्षातील नेत्यांमध्ये त्यांच्याबद्दल असलेले मतभेद शिबिरात उघड झाले.

हेही वाचा : भाजपचा बालेकिल्ला भेदण्याचे महाविकास आघाडीसमोर आव्हान

या शिबिराला राज्यातील पक्षाचे विभाग, तालुका, जिल्हाध्यक्ष आदी निमंत्रित सहभागी झाले होते. शिबिरात सर्वच नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘गद्दार’ उल्लेख करून त्यांच्यावर हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे यांनीही अजित अजित पवार यांच्यावर टीका केली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवस शिबिरात उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या निमंत्रितांची व्याख्याने जाणीवपूर्वक ऐकण्यासाठी वेळ दिला. समारोपाच्या दिवशी पवार यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करून केंद्रातील व राज्यातील सरकार घालण्यासाठी ‘इंडिया आघाडी’ एकजुटीने लढणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी एक दिलाने, एक विचाराने लढण्याच्या सूचना त्यांनी देत कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सर्वांनीच अजित पवार यांना लक्ष्य केले परंतु शरद पवार यांनी अजित पवार यांच्याकडे जाणीवपूर्वक पुर्ण दुर्लक्ष केले.

हेही वाचा : मराठवाड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासमोर आव्हान

पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने शिबिराचा नूर अचानक पालटला. शेवटच्या दिवशी आव्हाड यांनी या वादग्रस्त वक्तव्यानंतर खेद व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु घटनेबाबत राज्यभर आव्हाडांविरुद्ध प्रतिक्रिया उमटल्या. जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व सुप्रिया सुळे यांनी कुठलेही भाष्य केले नाही मात्र एकनाथ खडसे, रोहित पवार यांनी नाराजीचा सूर आळवला. आव्हाड यांनी पक्षाच्या व्यासपीठाचा वापर करुन वादग्रस्त वक्तव्य केल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांत नाराजीची भावना होती.

हेही वाचा : नाशिक जिल्हा बँकेच्या मतदारांना आपलेसे करण्याची अजित पवारांची रणनीती

शिबिरात तरूण कार्यकर्त्यांपेक्षा जेष्ठ कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कार्यकर्ते विखुरले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर हे दोन दिवसीय शिबिर कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करून त्यांना आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सक्रिय करण्यासाठी, पक्षाच्या नेत्यांनी उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विविध विरोधी पक्षांना एकत्रित केल्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय दिला जाऊ शकत नाही, तसाच राज्यातही तीन पक्षांच्या सरकारला विविध पक्षांनी एकत्रित येऊनच आव्हान देता येईल, याची जाणीवही शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मनात ठसवली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar rohit pawar ncp camp in shirdi after split in ncp print politics news css