सांगली : रेवडी संस्कृतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी टीका केली होती. मात्र, आता ‘लाडकी बहीण योजने’च्या माध्यमातून पैसे वाटप सुरू असून याचा अन्य सरकारी योजनांवर परिणाम होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार बैठकीत सांगितले.
खा.पवार म्हणाले, की लाडकी बहीण योजनेमुळे अनेक सरकारी योजनांचे पैसे वळते करण्यात आल्याचे अधिकारी खासगीत सांगत आहेत. विशेषत: आरोग्य विभागाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीवरही नियंत्रण ठेवण्यात आले आहे. मिरजेतील कर्करोग रुग्णालयाचे ४ कोटी रुपये थकीत असून, राज्यात आरोग्य योजनेसाठी देण्यात येणारे अनुदान सुमारे साडेसहाशे कोटी थकीत आहेे. अशा अनेक योजना रखडल्या आहेत. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना मदत होते याचे स्वागत करत असताना महिलांच्या सुरक्षेवरही अधिक लक्ष देण्याची गरज आहे. भाजपचे नितेश राणे, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांची वक्तव्ये त्यांच्या संस्कृतीला धरून असल्याची खोचक टीका करून खा. पवार म्हणाले, जर संस्कारच नसतील तर काय करणार?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत विचारले असता खा. पवार म्हणाले, गडकरी बऱ्याच वेळा त्यांना योग्य वाटते ते बोलतात. भले ते सरकारविरोधी असले तरी. त्यांच्यामुळे रस्त्यांची कामे चांगली झाली असून, त्याचा निश्चितच फायदा विकासाला होत आहे.
हेही वाचा >>> ३५ निर्णय, १७१ शासकीय आदेश! मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा पुन्हा धडाका
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हा प्रत्येक मराठी माणसाला मनापासून समाधान व्हावे असा निर्णय आहे. मात्र, आज मराठी शाळा बंद पडत आहेत, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. मुले मराठी शाळेत प्रवेशच घेत नसल्याने याचा परिणाम शिक्षकांवर होणार आहे, याचाही विचार करायला हवा.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ज्या ज्या ठिकाणी भाषणे करतात ते भाषणामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष ठेवा असे सांगतात. पक्ष फोडा असे सांगतात. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्यांनी असे वक्तव्य करणे योग्य नाही.
‘आरक्षण मर्यादा ७५ टक्के करा’
मराठा आरक्षणाबाबत विचारले असता पवार म्हणाले, की तमिळनाडूमध्ये जर ७८ टक्के आरक्षण दिले जात असेल, तर महाराष्ट्रात आरक्षण मर्यादा ७५ टक्के करायला हवी. यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेतला, तर त्याला पाठिंबा देऊ. मराठा आरक्षणाचा पहिला बळी शरद पवार असल्याची टीका अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली होती, याबाबत ते म्हणाले, मग त्यांचा लोकसभेला एकही उमेदवार का विजयी झाला नाही. ते केवळ प्रसिद्धीसाठी बोलतात अशी टीका पवार यांनी केली.