मुंबई : डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली दहा राजकीय पक्षांचे ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’ (यूपीए) सरकार तब्बल दहा वर्षे स्थिर राहिले, त्यामध्ये ज्या तीन व्यक्ती निर्णायक भूमिकेत होत्या, त्यामध्ये कॉ. सीताराम येचुरी आघाडीवर होते, अशी आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सांगितली.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉ. सीताराम येचुरी यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी महाविकास आघाडीकडून शोकसभेचे आयोजन केले होते. त्याला डाव्या व विविध प्रागतिक पक्षांचे तसेच सामाजिक आंदोलनाचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. तेव्हा शरद पवार बोलत होते.

हेही वाचा >>>विधानसभेचे पूर्वरंग: आरक्षणावरून असंतोष की ‘लाडकी बहीण’?

लोकशाही व संविधानिक संस्था धोक्यात आहेत. मोदी राजवट अधिक चालली तर सामान्य माणूस आणखी प्रभावित होईल. त्यामुळे विरोधकांची मोट बांधली पाहिजे, अशी येचुरी यांची भूमिका होती. त्यातून विस्कळीत असलेल्या विरोधकांची २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडी अस्तित्वात आली. म्हणून आज पर्याय उभा करण्याच्या काळात कॉ. येचुरी यांचे जाणे दुख:द आहे, अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली.

या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, माजी खासदार कुमार केतकर, काँग्रेस नेते हुसेन दलवाई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, ‘भाकप’चे सुभाष लांडे, अर्जुन डांगळे, डॉ. आनंद तेलतुंबडे, माकप पॉलिटब्युरो सदस्य निलोत्पल बसू, डॉ. अशोक ढवळे, ‘रिपाइं’चे राजेंद्र गवई, तुषार गांधी, ‘आप’चे धनंजय शिंदे, सर्वहारा जनआंदोलनाच्या उल्का महाजन, नरसय्या आडम यांनी येचुरी यांच्या आठवणी सांगितल्या. माकप नेते उदय नारकर यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.