शनिवारी (१ जून) सातही टप्प्यांतील मतदान पार पडल्यानंतर सायंकाळी एक्झिट पोल्सची आकडेवारी यायला सुरुवात झाली. बहुतांश सगळ्याच एक्झिट पोल्सनी भाजपाचे सरकार बहुमताने पुन्हा एकदा सत्तेवर येणार असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते व तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना एक्झिट पोल्सनी मांडलेली आकडेवारी धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. एक्झिट पोल्समधून बाहेर आलेल्या आकडेवारीचा आणि लोकांच्या वास्तवातील प्रतिक्रियांचा काहीही सहसंबंध नसून हे एक्झिट पोल्स फोल असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी इतरही अनेक विषयांवर भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रश्न : काँग्रेसच्या प्रचाराचे मूल्यांकन कशा प्रकारे करता?

मतदारांना काँग्रेसने दिलेला संदेश पुरेसा सुस्पष्ट होता. ही निवडणूक मंदिर अथवा पंतप्रधान मोदींचे वक्तृत्व अथवा अशा कोणत्याही मुद्द्यांपेक्षा लोकांच्या कुटुंबाच्या हिताची अधिक आहे, हे अधोरेखित करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. भाजपाच्या मागील १० वर्षांच्या सत्ताकाळात आपल्याला अथवा आपल्या कुटुंबाला खरंच काही फायदा झाला आहे का, याचे आत्मपरीक्षण करण्याची संधी मतदारांना मिळाली पाहिजे. जेव्हा आम्ही लोकांशी बोलत होतो तेव्हा जाणवले की, आपले उत्पन्न, रोजगाराची स्थिती अथवा आयुष्याचा दर्जा कोणत्याही अर्थाने सुधारला नसल्याचे लोकांच्या लक्षात आले आहे. ‘पाच न्याय’ या आश्वासनांच्या आधारे आम्ही एक मजबूत असा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवू शकलो. बेरोजगारी, उत्पन्नातील घट व महागाई यांसारख्या दीर्घकालीन समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्याला वास्तवामध्ये काही महत्त्वाच्या उपाययोजना अमलात आणाव्या लागतील, हा संदेश लोकांपर्यंत गेला.

हेही वाचा : भाजपाला एकहाती सत्ता मिळवून देणारे पेमा खांडू आहेत तरी कोण?

प्रश्न : काँग्रेस आणि इंडिया आघाडी कशी कामगिरी करील, असे तुम्हाला वाटते?

काँग्रेस पक्षाला कमीत कमी तीन आकडी संख्या नक्कीच गाठता येईल आणि एकूण इंडिया आघाडीला २९५ जागा मिळतील, अशी अपेक्षा आम्हाला आहे. काँग्रेस अध्यक्षांनी इंडिया आघाडीतील इतर सर्व घटक पक्षांशी चर्चा करूनच या २९५ जागांची अपेक्षा केली आहे.

प्रश्न : एक्झिट पोल्समधील आकडे धक्कादायक होते का?

सर्वच एक्झिट पोल्समधील आकडे मला धक्कादायक वाटले. मी केरळ, महाराष्ट्र, बिहार, पंजाब अशा अनेक राज्यांमध्ये प्रचारासाठी फिरलो आहे. प्रत्यक्ष मैदानातील लोकांच्या प्रतिक्रिया आणि एक्झिट पोल्सचा काहीही संबंध दिसत नाही. ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया मला प्राप्त झाल्या आहेत, त्यांचे प्रतिबिंब एक्झिट पोल्समध्ये पडलेले दिसत नाही. हे फक्त माझे म्हणणे आहे, असे नाही. मी इतरही अनेक जुने-जाणते निवडणूक विश्लेषक, सामान्य कार्यकर्ते व प्रसारमाध्यमांतील लोकांशी बोलत होतो. त्यामुळे देशाच्या प्रत्येक भागात आम्ही कशी कामगिरी करणार आहोत, याची पुरेशी कल्पना मला आली होती. एक्झिट पोल्सनी भाजपाची फुशारकी करण्यामध्ये आपले हात अधिकच मोकळे सोडले आहेत. मात्र, प्रत्यक्ष मैदानातील परिस्थिती तशी नसल्याचे माझे आकलन आहे.

प्रश्न : केरळसहित दक्षिणेतील इतर राज्यांमधील एक्झिट पोल्सच्या आकडेवारीबाबत काय सांगाल?

मला अक्षरश: धक्का बसला आहे. प्रत्येक एक्झिट पोलमध्ये भाजपाला केरळ राज्यामध्ये एक ते सात जागा दिल्या गेल्याचे मी पाहिले. ज्यांनी त्यांना एक ते तीन अथवा दोन ते तीन जागा दिल्यात, त्यांच्याबद्दलही मला आश्चर्य वाटते. काहीतरी अनाकलनीय अशी जादू झाल्याशिवाय केरळमध्ये भाजपाची एकही जागा निवडून येणे अशक्य आहे. हेच तमिळनाडूबाबतही लागू पडते. मी तमिळनाडूतील अनेक लोकांबरोबर बोललो आहे. एक्झिट पोल्समधील हे सगळे अंदाज ओढून-ताणून व्यक्त केलेले आणि फारच हास्यास्पद आहेत.

प्रश्न : मात्र, भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढू शकते का?

कदाचित वाढू शकते. तेही मोजक्या काही भागांमध्ये. मात्र, केरळमध्ये भाजपा गेल्या काही निवडणुकांमध्ये १२-१३ टक्के मतांवर अडकलेला आहे. त्यामध्ये अचानक वाढ होईल, असे मला वाटत नाही. जर त्यामध्ये हळूहळू वाढ झाली अथवा त्यांच्या मतटक्क्यांमध्ये एक-दोन टक्क्यांची वाढ झाली, तर त्यात मला काहीही आश्चर्य वाटणार नाही. गेल्या निवडणुकीमध्ये केरळमधील एका आघाडीच्या वृत्तपत्राने एक्झिट पोल्सच्या आधारावर पहिल्या पानावर अशी बातमी छापली होती की, मतदारसंघात माझा पराभव होईल. तिथे मी एक लाखाच्या मताधिक्याने जिंकून आलो. वस्तुस्थिती अशी आहे की, एक्झिट पोल अजिबात अचूक किंवा निर्दोष नसतात. तसेच भारतीय समाजामधील वैविध्य पाहता, या एक्झिट पोल्सनी निवडलेले नमुने शास्त्रीय असतातच, याची काहीही खात्री नसते.

हेही वाचा : एक्झिट पोल्सवर विश्वास नाही; आम्ही २९५ च्या पार जाऊ – इंडिया आघाडीचा दावा

प्रश्न : भाजपा तिसऱ्यांदा सत्तेत येईल, हा एक्झिट पोल्सचा दावा खरा ठरेल, असे मानले तर काँग्रेसची कामगिरी कशी असेल, असे तुम्हाला वाटते?

एक्झिट पोल्समध्ये वर्तविण्यात आलेले काही अंदाज खरे ठरले तरी काँग्रेसची अवस्था एवढीही वाईट असणार नाही. जरी आम्ही पराभूत झालो तरीही मला अशी निश्चितच खात्री आहे की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी आमची कामगिरी नक्कीच सुधारलेली असेल. मात्र, खरी आकडेवारी हातात आल्याशिवाय काँग्रेसवर त्याचे काय परिणाम होतील, हे आताच सांगणे कठीण आहे. काही महत्त्वाच्या राज्यांमधील कामगिरी जर लक्षणीयरीत्या सुधारली, तर येणाऱ्या काळातील काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला त्याचा नक्कीच फायदा होईल. २०१४ वा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीचे चित्र आहे, असे मला वाटत नाही. माझ्या मते- अत्यंत वाईट परिस्थितीतही काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या एकूण कामगिरीत लक्षणीय सुधारणा होईल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shashi tharoor exit polls congress opposition performance loksabha elextion 2024 vsh