Shashi Tharoor Interview : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळच्या तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. काही दिवसांपूर्वी शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचं तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यानंतर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्याबरोबर त्यांनी सेल्फीही काढला. काँग्रेसने आपल्या नीतीमध्ये बदल करत मतपेटीच्या बाहेरचा विचार करून नव्या मतदारांना आकर्षित केले पाहिजे, असा एक विचार त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे शशी थरूर हे काँग्रेस सोडून भाजपात जाणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. या सर्व अटकळांबद्दल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधला आणि काँग्रेसमधील पक्षांतर्गत मतभेदांसह अनेक विषयांवर मोकळेपणाने भाष्य केलं.
शशी थरूर नेमकं काय म्हणाले?
द इंडियन एक्स्प्रेसच्या ‘वर्तमानम’ या मल्याळम भाषेतील साप्ताहिक पॉडकास्टमध्ये बोलताना थरूर यांनी काँग्रेस पक्षाबाबत रोखठोक मते मांडली आहेत. लिझ मॅथ्यू यांना दिलेल्या मुलाखतीत थरूर यांनी उदारमतवाद आणि भारताच्या बहुलवादी नीतिमत्तेवरील त्यांचा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त केला. “मी नेहमीच एक उत्कृष्ट उदारमतवादी आहे. मी सांप्रदायिकतेला विरोध करतो आणि आर्थिक विकासासोबत सामाजिक न्यायावर विश्वास ठेवतो”, असं शशी थरूर म्हणाले.
शशी थरूर काँग्रेस सोडणार?
भाजपामध्ये सामील होण्याच्या चर्चांना थरूर यांनी पूर्णविराम दिला. “पक्षाबरोबर माझे वैचारिक मतभेद असले तरी मी कुठेही जाणार नाही”, असं त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहाच्या मुद्द्यावर बोलताना तिरुअनंतपुरमचे खासदार म्हणाले, “माझ्याच पक्षातील काही लोक मला विरोध करतात, पण मी भारत आणि केरळच्या भविष्याचा विचार करूनच बोलतो. माझ्यावर कितीही टीका झाली तरीही मी काँग्रेसशी एकनिष्ठ राहणार आहे. गरज पडल्यास पक्षाने दिलेली मोठी जबाबदारी स्वीकारण्याची माझी तयारी आहे.”
आणखी वाचा : Gujarat Election : भाजपाच्या तिकिटावर निवडून आले सर्वाधिक मुस्लीम उमेदवार; गुजरात निवडणुकीत काय घडलं?
‘करिअर म्हणून राजकारणात प्रवेश केला नाही’
आपल्या राजकीय भवितव्याबाबत बोलताना, थरूर यांनी उघडपणे भाष्य करणं टाळलं. जनतेच्या सेवेसाठी मी पक्षात राहून कायम काम करेन, असं ते म्हणाले. “राजकीय भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी मी राजकारणात आलेलो नाही. करिअर म्हणून मी राजकारणाकडे पाहत नाही”, असं शशी थरूर यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांमधील त्यांच्या पार्श्वभूमीचा उल्लेख केला. सोनिया गांधी, दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी केलेल्या विनंतीमुळेच मी राजकारणात आलो, असं थरूर म्हणाले.
मोदींच्या कौतुकानंतर शशी थरूर काय म्हणाले?
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पिनराई विजयन यांच्या लेफ्ट ड्रेमोक्रॅटिक फ्रंट सरकारचे कौतुक केल्याप्रकरणी शशी थरूर यांंनी अलीकडेच स्पष्टीकरण दिलं होतं. ते म्हणाले होते की, मी देशाच्या आणि केरळच्या विकासासंदर्भातील माझी मते नेहमीच रोखठोकपणे मांडत आलो आहे. माझ्यासारख्या राजकारण्याने राजकीय विचारांच्या बाबतीत लहान विचार करून चालणार नाही, त्यामुळेच मला जे चांगलं वाटतं, त्याबद्दल मी मोकळ्या मनाने बोलतो, मग काँग्रेस पक्ष त्या गोष्टीच्या विरोधात का असेना.
काँग्रेसला दिला होता अप्रत्यक्ष इशारा
“काँग्रेसला माझी गरज नसेल तर माझ्याकडे पर्याय आहेत”, असा अप्रत्यक्ष इशाराही शशी थरूर यांनी पक्षाला दिला होता. या वक्तव्यानंतर सीपीआयएमचे नेते थॉमस इस्साक यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीत येण्याचं आवाहन केलं होतं. त्याचबरोबर आम्ही थरूर यांना एकटं पडू देणार नाही, असंही ते म्हणाले होते.
दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत आपल्या वैचारिक प्रवृत्तीबद्दल बोलताना थरूर म्हणाले की, मी नेहमीच एक उदारमतवादी नेता म्हणून राहिलो आहे. जातीयवादाला माझा विरोध असून आर्थिक विकासाबरोबर सामाजिक न्यायावरही मी विश्वास ठेवतो. यावेळी शशी थरूर यांना वैयक्तिक आयुष्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. प्रत्युत्तरात ते म्हणाले, “आई मला नेहमीच लग्न करण्याचा सल्ला देत असते. परंतु, मी सध्याच्या आयुष्यात सुखी असून देवाने मला सर्वकाही दिलं आहे.”
हेही वाचा : Political News : उत्तराखंडमध्ये भाजपा अडचणीत? अर्थमंत्री अडकले वादाच्या भोवऱ्यात; कारण काय?
शशी थरूर यांच्याबद्दल काँग्रेसची प्रतिक्रिया काय?
शशी थरूर यांच्या या पवित्र्यानंतर काँग्रेसचे केरळमधील नेते के. एम. मुरलीधरन म्हणाले, “थरूर यांना काँग्रेस पक्षाबाबत काही अडचण असेल तर ती पक्षाअंतर्गतच सोडवली पाहिजे. त्यांनी पक्ष सोडण्याची गरज नाही. संसदेत राष्ट्रीय विषयांवर बोलताना थरूर यांनी पक्षाची भूमिका चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे.”
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला म्हणाले की, मुलाखतीमध्ये शशी थरूर काय बोलले यावरून गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही. मी केरळाचा अध्यक्ष असताना त्यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले होते. आमच्या पाठिंब्यामुळेच ते चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना मंत्रिपद आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्यपदही देण्यात आलं आहे.
केरळमध्ये काय आहे वाद?
केरळमध्ये सध्या काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंट हा मुख्य विरोधी पक्ष आहे. काही दिवसांपूर्वी शशी थरुर यांनी राज्याच्या विकासाबाबत बोलताना सकारात्मक वक्तव्य केलं होतं. तेव्हा काँग्रेस पक्षाचं स्थानिक वृत्तपत्र वीक्षणम डेलीनं त्या विषयावरून थरुर यांच्यावर टीका केली. यावर स्पष्टीकरण देताना शशी थरूर म्हणाले होते की, मी सत्ताधारी पक्षाची प्रशंसा केली नव्हती. फक्त स्टार्टअप क्षेत्रातील केरळची प्रगती सांगण्याचा प्रयत्न केला होता.