सध्या काँग्रेस पक्षात अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोतही काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. ते अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरत असल्याने त्यांना राजस्थानचं मुख्यमंत्रीपद सोडावं लागणार आहे, यामुळे राजस्थानमध्ये संत्तासंघर्ष निर्माण झाला आहे. एकीकडे राजस्थानमध्ये राजकीय उलथापालथ सुरू असताना काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी आपण काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. आपल्याला देशातील बहुतेक राज्यांचा पाठिंबा असल्याचंही थरूर यांनी म्हटलं आहे.
केरळातील पलक्कड येथे प्रसारमाध्यमांना संबोधित करताना शशी थरूर म्हणाले की, मी गांधी कुटुंबीयांना भेटलो आहे. मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवतोय, याबाबत त्यांना कोणतीही समस्या नाही. मी पलक्कड येथून राहुल गांधीच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होणार आहे. गांधी घराण्यातील तिघांनीही मला सांगितलं आहे की, काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबाबत त्यांना कोणतीही समस्या नाही.
“जेव्हा एखादी व्यक्ती निवडणूक लढत असते, तेव्हा त्याच्यात आत्मविश्वास असायला हवा. मग प्रतिस्पर्धी कोण आहे? याचा काहीही फरक पडत नाही. सर्वांनी बहुमताने निर्णय घ्यायला हवा. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकापेक्षा अधिक उमेदवार असावेत, या मताचा मी आहे. देशातील बहुसंख्य राज्यांतून मला पाठिंबा मिळत आहे. बर्याच लोकांनी मला फोन केला असून मी निवडणूक लढवावी, यासाठी आग्रह केला आहे, असंही थरूर म्हणाले.
हेही वाचा- राजस्थानमध्ये राजकीय वादळ; काँग्रेसच्या ८२ आमदारांचा विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द
केरळमधील काँग्रेस युनिटच्या भूमिकेचा संदर्भ देत थरूर म्हणाले, “केरळमध्येही मला नक्कीच पाठिंबा मिळेल. पण काहीजण असेही असू शकतात, जे मला समर्थन देत नाहीत. पण याचा फारसा फरक पडत नाही. कारण लोकशाही व्यवस्थेत मतभिन्नता असावीच लागते” असंही ते म्हणाले. यावेळी राजस्थानात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाबाबत विचारलं असता, थरूर यांनी थेट भाष्य करणं टाळलं आहे. राजस्थानातील घडामोडींबाबत आपल्याला फारशी माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा- राजस्थानमधील सत्तासंघर्षावर गुलाम नबी आझादांचं आठ शब्दांत उत्तर, म्हणाले…
शशी थरूर यांनी अशावेळी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. ज्यावेळी केरळातील काँग्रेसच्या काही नेत्यांनी राहुल गांधींना आधीच पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे, अशी इच्छा केरळमधील अनेक काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला आणि के मुरलीधरन या दोन्ही माजी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केरळमधील पक्ष राहुल गांधींच्या बाजूने असेल, असं उघडपणे सांगितलं आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना शशी थरूर यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.