काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केरळ विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत संकेत दिले आहेत. त्यांनी केरळच्या राजकारणात आपलं स्वारस्य दाखवलं आहे. सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना थरूर म्हणाले की, प्रत्येकाची इच्छा आहे की त्यांनी आपल्या राज्यात काम करावं. त्यामुळे ते लोकांच्या इच्छेविरोधात जाऊ शकत नाहीत. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवल्यानंतर थरूर यांनी केरळच्या राजकारणात स्वारस्य दाखवलं आहे. त्यामुळे आगामी केरळ विधानसभा निवडणुकीत थरूर यांना संधी मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
खरं तर, थरूर यांनी सोमवारी कोट्टायम येथे ऑर्थोडॉक्स चर्चचे प्रमुख बेसेलिओस मार थॉमस मॅथ्यूज तिसरे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपलं केरळच्या राजकारणात उतरण्याबाबत संकेत दिले आहेत. थरूर यांच्या विधानानंतर काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- तेलंगणात केसीआर यांना मोठा धक्का? BRSचा तगडा नेता अमित शाहांची भेट घेणार
चर्चच्या प्रमुखांसोबतची बैठक पार पडल्यानंतर थरूर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं, “ऑर्थोडॉक्स चर्चच्या प्रमुखांची इच्छा आहे की मी केरळच्या राजकारणात अधिक सक्रिय व्हावं. मलाही केरळमध्ये काम करण्यात रस आहे. अनेकजण मला माझी कर्मभूमी असलेल्या केरळमध्ये अधिक सक्रिय होण्यास सांगत आहेत. मी इथून पळून जाणार नाही. २०२६ (पुढील केरळ विधानसभा निवडणूक) यायला अजून बराच अवधी बाकी आहे. तत्पूर्वी केरळात अनेक गोष्टी करायच्या आहेत,” असं थरूर म्हणाले.
थरूर यांनी पुढे सांगितलं की, त्यांचा हा उपक्रम केवळ बिशप किंवा इतर समुदायांच्या धार्मिक गुरुंना भेटण्यापुरता मर्यादित नाही. “केरळमध्ये राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप मजबूत नागरी समुदाय आहे. त्यांचा आदर करून आणि त्यांना समजून घेऊन आपण कार्य केलं पाहिजे. त्यामुळे मी एकापाठोपाठ एक त्यांना भेटी देत आहे,” असंही थरूर म्हणाले.