Shatrughan Sinha Non-Veg Ban: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा हे त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. शॉटगन असे टोपण नावही त्यांना मिळालेले आहे. समान नागरी कायद्याबाबत त्यांनी एक विधान केले, ज्यामुळे आता त्यांच्या पक्षाचीच अडचण झाली आहे. भाजपा ते तृणमूल व्हाया काँग्रेस असा राजकीय पक्षांचा प्रवास करणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांनी संसदेच्या आवारात समान नागरी कायद्याबाबत बोलत असताना संपूर्ण देशभरात मांसाहारावर बंदी घालावी, अशी मागणी केली. हे माझे वैयक्तिक मत आहे, असेही सांगायला ते विसरले नाहीत. मात्र त्यांच्या विधानाचा जो परिणाम व्हायचा तो झालाच. यावरून आता तृणमूल काँग्रेसवर भाजपा आणि कम्युनिस्ट पक्षाने टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संसदेच्या आवारात समान नागरी कायद्याबाबत बोलत असताना खासदार शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “समान नागरी कायद्याला प्रत्येकाने पाठिंबा दिला पाहिजे. यावर राजकारण करणे योग्य नाही. देशात गोमांसावर बंदी घातली आहे. पण काही ठिकाणी बंदी आहे, तर काही ठिकाणी बंदी नाही. हे योग्य नाही. मला विचाराल तर केवळ गोमांस नाही तर संपूर्ण देशात मांसाहारावरच बंदी घातली पाहिजे.”

शुत्रघ्न सिन्हा यांच्या या विधानावर आता वादळ उठले आहे. सिन्हा पश्चिम बंगालमधून तृणमूलच्या तिकिटावर लोकसभेत गेले आहेत. पश्चिम बंगाल राज्यात मांसाहाराला विशेष महत्व आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसने सिन्हा यांच्या विधानापासून लगेचच हात झटकले आणि त्यांचे हे मत वैयक्तिक असल्याचे म्हटले. तृणमूल काँग्रेस हा भाजपाचा कडवा टीकाकार असून ‘कुणी काय खावे, काय घालावे’ हे भाजपाने सांगू नये, असा युक्तिवाद तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी आजवर करत आले आहेत.

सिन्हा यांच्या विधानावर बोलत असताना तृणमूल काँग्रेसचे महासचिव कुणाल घोष म्हणाले, आमच्या नेत्या ममता बॅनर्जी या खाण्याच्या सवयी, धर्म आणि पेहरावाच्या स्वातंत्र्याचा आग्रह धरत आल्या आहेत. त्यामुळे या विषयात पुन्हा जाण्याची गरज नाही. कुणी काय खावे? हे सांगण्याची मुळात गरजच काय? जर कुणी याबद्दल बोलत असेल तर ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्यावर आम्ही बोलू इच्छित नाही.

कोलकाता मनपाचे उपमहापौर आणि तृणमूलचे नेते अतीन घोष म्हणाले, मला शाकाहार खूप आवडतो आणि मी मांसाहारही तेवढ्याच आवडीने खातो. मला हवे ते खाण्याचे स्वातंत्र्य आहे. याबद्दल कुणीही मला सांगण्याची गरज नाही. तृणमूलचे माजी खासदार जवाहर सरकार म्हणाले की, सिन्हा यांनी काय खायचे, हा त्यांचा प्रश्न आहे. संपूर्ण देशात मांसाहारावर बंदी घालावी, असे होऊ शकत नाही. जर काही मूठभर लोकांना शाकाहार लादायचा असेल तरी हे शक्य होणार नाही कारण देशातील बहुसंख्य जनता मांसाहारी आहे. त्यामुळे असे करणे हे संविधानाच्या विरोधात असेल.

भाजपाकडून तृणमूलवर टीका

तृणमूल काँग्रेसवर टीका करताना भाजपा नेते आणि पश्चिम बंगालचे महासचिव जगन्नाथ चट्टोपाध्याय म्हणाले, शत्रुघ्न सिन्हा जे म्हणाले, त्याला मी समर्थन देतो. पण ममता बॅनर्जी यांना या विधानाबाबत काय वाटते? हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे.

सीपीआय (एम) च्या केंद्रीय समितीचे नेते सुजन चक्रवर्ती म्हणाले, सिन्हा यांचे विधान भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील साटेलोटे सिद्ध करणारा आणखी एक पुरावा आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला जे ऐकायला आवडेल, ते सिन्हा बोलत आहेत. संघाला खूश ठेवण्याचे काम तृणमूलकडून केले जाते. तृणमूलच्या खासदार रचना बॅनर्जी यांनी महाकुंभेळ्याला हजेरी लावली, याकडेही चक्रवर्ती यांनी लक्ष वेधले. महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीकडे दुर्लक्ष करून रचना बॅनर्जी यांनी योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले. संघाला जे बोलायचे आहे तेच तृणमलूकडून बोलले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मांसाहारावर टीका

मागच्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी श्रावण महिन्यात मांसाहार करणाऱ्या विरोधकांवर टीका केली होती. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव आणि त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी राहुल गांधीसह मटणाचा आस्वाद घेतला होता. सदर व्हिडीओचा संदर्भ देऊन पंतप्रधान मोदींनी ही टीका केली होती. मोदींच्या या टीकेनंतर ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांनी मोदींवर पलटवार करताना प्रत्येकाला मनाला वाटेल ते खाण्याचा अधिकार असल्याचे म्हटले होते.

शत्रुघ्न सिन्हा यांनी याआधी भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांबरोबर काम केले आहे. अनेक दशके भाजपाबरोबर घालविल्यानंतर २०१९ च्या निवडणुकीआधी शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत पाटना साहीब इथून लोकसभा निवडणूक लढविली, मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०२२ साली त्यांनी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघातून सिन्हा दोन वेळा निवडून आले आहेत. या मतदारसंघात बिहारी नागरिक मोठ्या संख्येने आहेत.