Sheesh Mahal Delhi Arvind Kejriwal : दिल्लीतील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ६, फ्लॅग स्टाफ रोडवरील बंगल्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या बंगल्याला आम आदमी पार्टीच्या सरकारने ‘शीशमहल’ असं नाव दिलs आहे. त्यावेळी हे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निवासस्थान होते. आता हा बंगला स्टेट गेस्ट हाउस (राज्य सरकारचे शासकीय अतिथीगृह) म्हणून वापरले जाणार आहे. केजरीवाल सरकारने या इमारतीचे अवाजवी नुतनीकरून करून तिचे आलिशान बंगल्यात रुंपातर केले होते. यावर करण्यात आलेल्या खर्चावरून व केजरीवाल यांनी या बंगल्याचा वापर करण्यावरून भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीच्या काळात केजरीवाल यांच्यावर व आम आदमी पार्टीवर सडकून टीका केली होती.

अरविंद केजरीवाल दिल्लीतल्या जनतेसमोर स्वतःची सामान्य माणूस म्हणून अशी प्रतिमा सादर करू पाहात होते. मात्र, भाजपाने सामान्य माणूस इतका खर्च करतो का? सामान्य माणूस महालात राहतो का? असे प्रश्न उपस्थित करून केजरीवाल यांना निवडणूक काळात घेरण्याचा प्रयत्न केला होता. तसेच या बंगल्याच्या नुतनीकरणासाठी केलेल्या खर्चावरून भाजपाने केजरीवाल व आम आदमी पार्टीच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच आप हा सामान्य माणसाचा पक्ष नसून श्रीमंतांचा आणि एका व्यक्तीचा पक्ष असल्याची टीका केली होती.

दिल्लीत अतिथीगृह नाही

दरम्यान, दिल्लीतील नव्या भाजपा सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत माहिती देताना एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की “दिल्लीला भेट देणाऱ्या मान्यवरांसाठी राज्य अतिथीगृहाची आवश्यकता आहे. इतर राज्यांमध्ये अशी अतिथीगृह आहेत. मात्र, दिल्लीत अतिथीगृह नाही. त्यामुळे ६, फ्लॅग स्टाफ रोडवरील ही इमारत अतिथीगृहात रुपांतरित करण्याचा विचार केला जात आहे.” मात्र, अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे देखील या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. ते म्हणाले, “सध्या केवळ ही योजना विचाराधीन आहे. आम्ही अंतिम निर्णयाची वाट पाहात आहोत.” फ्लॅग स्टाफ रोड हा सिव्हिल लाइन्स परिसरात येतो. याच भागात राजभवन, दिल्लीची विधानसभा व सचिवालय देखील आहे.

याच अधिकाऱ्याने अधिक माहिती देताना सांगितले की १९९० च्या दशकात ६, फ्लॅग स्टाफ रोडच्या शेजारी असलेली मालमत्ता, ३३, शामनाथ मार्ग ही राज्य अतिथीगृह म्हणून निवडली होती. तिथे अतिथीगृह उभारण्याची योजना आखली होती. मात्र तीन ते चार वर्षांनी तत्कालीन सरकारने तो विचार सोडून दिला. तेव्हापासून दिल्लीत कुठेही अतिथीगृह नाही. तर, आप सरकारच्या काळात ३३, शामनाथ मार्ग दिल्लीच्या थिंक टँक डायलॉग अँड डेव्हलपमेंट कमिशनचा पत्ता होता.

मालमत्ता बांधकाम विभागाच्या ताब्यात

१९४२ मध्ये बांधण्यात आलेल्या ६, फ्लॅग स्टाफ रोड या बंगल्यात तेव्हा पाच बेडरूम, एक हॉल आणि एक कार्यालय होते. लुटियन्स दिल्लीच्या बाहेरील सर्वात मोठ्या व प्रशस्त मालमत्तांपैकी ही एक मोठी मालमत्ता होती. १९६० पासून ही मालमत्ता व आसपासचा परिसर दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा आहे.

हा बंगला पूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चौधरी प्रेम सिंह यांचे निवासस्थान म्हणून ओळखला जात होता

याआधी ही मालमत्ता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चौधरी प्रेम सिंह यांचे निवासस्थान होती. त्यांनी दोन वेळा दिल्ली विधानसभेचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यानंतरच्या काळात हाच बंगला दिल्ली सरकारमधील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना देण्यात आला.

२०२१ नंतर बंगल्याचे नुतनीकरण करण्याचा निर्णय

२०२० च्या पावसाळ्यात या बंगल्यातील एका खोलीचे छप्पर कोसळले. तसेच करोना काळात एका शौचालयाचे छत कोसळले. त्यानंतर आप सरकारने या बंगल्याचे नुतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी बंगल्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिटमध्ये या बंगल्याचे नुतनीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले होते.