हर्षद कशाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग : विधान परिषदेचा कोकण शिक्षक मतदारसंघ हा पारंपारिक भाजपशी संलग्न शिक्षक मतदारसंघ. पण गेल्या निवडणुकीत शेकापचे बाळाराम पाटील यांनी अनपेक्षितरित्या विजय मिळविला असला तरी यंदा हा मतदारसंघ कायम राखण्याचे शेकापसमोर आव्हान असेल. हा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्याकरिता भाजपने तयारी केली आहे.

काही अपवाद वगळले तर या मतदान संघावर कायम भाजप प्रणित शिक्षक परिषदेचा वरचष्मा राहीला आहे. सुरवातीला प्रभाकर सावंत, त्यानंतर वसंत बापट, सुरेश भालेराव , रामनाथ मोते शिक्षक परिषदेकडून या विधान परिषदेवर निवडून आले. वसंत बापट आणि रामनाथ मोते यांनी प्रत्येकी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र गेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने शेकापने भाजपचे संस्थान खालसा केले होते. पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेचे काम करणारे बाळाराम पाटील पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून गेले होते.

हेही वाचा >>> शिंदे गटाला सोबतीला निळा झेंडा मिळाला

गेल्या निवडणुकीत रामनाथ मोते यांना डावलत वेणुनाथ कडू यांना उमेदवारी देण्याचा निर्णय शिक्षक परिषदेने घेतला होता. त्यामुळे नाराज झालेल्या मोते यांनी बंडखोरी केली. ही बंडखोरी शिक्षक परिषदेला भोवली. वेणुनाथ कडू मतदारांवर प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. दुसरीकडे शिक्षक भारतीच्या अशोक बेलसरे यांनी शिक्षक परिषदेची मते मोठय़ा प्रमाणात आपल्याकडे खेचली. या परिणाम निवडणूक निकालावर झाला. त्यामळे भाजपचे वर्चस्व असलेला हा मतदार संघ शेकापच्या ताब्यात गेला होता. भाजपप्रणीत शिक्षक परिषदेत झालेली बंडखोरी, शिवसेनेच्या उमेदवारीने अनपेक्षितपणे मारलेली मुसंडी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा हे सारेच मुद्दे शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांच्या पथ्यावरच पडली होती.

हेही वाचा >>> अकोल्यातील नेत्यांना सत्ताधारी पक्षाचे वेध

आता पुन्हा एकदा निवडणूकीला सामोरे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेससह यंदा शिवसेना उध्दव ठाकरे गट आणि काँग्रेसची साथ मिळणार आहे.  या फायदा बाळाराम पाटलांना होऊ शकेल. या शिवाय रयत शिक्षण संस्था, कोकण एज्युकेशन सोसायटी, पिएनपी एज्युकेशन सोसायटी, सुधागड एज्युकेशन सोसायटी यांची मदतही त्यांना होऊ शकणार आहे. 

हेही वाचा >>> शिंदे-कवाडे युतीचा राजकीय लाभ कोणाला?

दुसरीकडे भाजपने शिक्षक आघाडीच्या माध्यमातून हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी तयारी सुरु केली आहे. कपिल पाटील आणि रविंद्र चव्हाण यांनी यासाठी मोर्चे बांधणीला सुरवात केली आहे. गेल्या वेळी झालेली बंडखोरी पुन्हा होऊ नये यासाठी सावध पाऊले उचलली आहेत. त्यामुळेच उमेदवारी जाहीर करण्यास उशीर होत आहे. शिक्षक परिषदेच्या उमेदवाराला बाळासाहेबांच्या शिवसेनेचा पाठींबा मिळणार आहे. या दोन प्रमुख उमेदवारांसह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद वेणूनाथ कडू  आणि शिक्षक भारतीचे धनाजी पाटील उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे मतदारसंघात चौरंगी लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे. ही मतविभागणी कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मतदार संघात ३७ हजार शिक्षक मतदार आहे. यातील सर्वाधिक १५ हजार मतदार हे एकट्या ठाणे जिल्ह्यातील आहे. त्याखालोखाल रायगड जिल्ह्यात दहा हजार मतदार आहेत. त्यामुळे निवडणूक निकालांत या दोन जिल्ह्यातील मतदारांचा कौल निर्णायक ठरेल यात शंका नाही.

          ठाणे      १४६९५

          रायगड    १००८७

          पालघर     ६७१८

          रत्नागिरी   ४०६९

          सिंधुदुर्ग    २१६४