वर्धा : जातीय समीकरण व पक्षनिष्ठा या निकषावर कॉग्रेसने शेखर शेंडे यांची उमेदवारी जाहीर केली असतांनाच मित्रपक्षाने मात्र विरोधाची सूर आळवले आहे. कॉग्रेस पक्षात वर्धा मतदारसंघासाठी शेखर शेंडे, डॉ.सचिन पावडे व डॉ.उदय मेघे हे तिघे तिकिट मागण्यात आघाडीवर होते. अंतिम टप्प्यात डॉ.पावडे यांचे नाव अंतिम झाल्याची चर्चा उसळली. मात्र भाजपने देवळीतून तेली समाजाचा उमेदवार दिल्याने तेली समाजाचा गड समजल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील आघाडीचे समीकरण बिघडू नये, असा विचार बळावला. डॉ.पावडे व डॉ.मेघे हे पक्षाचे साधे सदस्यही नसतांना त्यांचा विचार कसा होवू शकतो, अशी पृच्छा एका ज्येष्ठ नेत्याने करीत पक्षनिष्ठेचा मुद्दा रेटला. आणि येथूनच शेंडेंचे नाव पुढे सरकले. ते तीन वेळा पराभूत झाल्याची बाब मागे पडली. शनिवारी सकाळी शेखर शेंडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर निष्ठावंतांचा जीव भांड्यात पडला. शेंडे यांच्या निवासस्थानी मोठा जल्लोष उडाला.

हे ही वाचा… शहाद्यात भाजपमधून आलेल्या राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमधील इच्छुक संतप्त

राष्ट्रवादीत नाराजी

इकडे शेंडे निवासस्थानी जल्लोष होत असतांनाच दुसरीकडे मित्रपक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटात नाराजीचे सूर उमटत होते. या गटाचे जिल्ह्याचे सर्वेसर्वा व माजी आमदार प्रा.सुरेश देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली. कॉग्रेसचा उमेदवार तीनवेळा पडला असल्याने वर्धेची जागा शरद पवार गटाला मिळणार असल्याची खात्री होती. मात्र मिळाली नसल्याने व पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला सूचीत न केल्याने आमचा वेगळा निर्णय राहील. सोमवारी समीर देशमुख यांचा उमेदवारी अर्ज सादर करणार. आघाडीचा उमेदवार बदलू शकतो. कॉग्रेस पक्षात काही घडू शकते. आमच्या गटाच्या नेत्यांनी ही निवडणूक लढण्याचा चंग बांधला असल्याचे प्रा.देशमुख म्हणाले.

यावेळी उपस्थित पक्षनेते समीर देशमुख हे म्हणाले की जिल्ह्यात शरद पवार गटावर सतत अन्याय होत आहे. लोकसभा निवडणूकीत आमच्याजवळ सक्षम उमेदवार असतांनाही ही जागा कॉग्रेसच्या नेत्याला आमच्या पक्षाने दिली. आताही वर्धा विधानसभेची जागा आमच्या पक्षाला मिळण्याची दाट शक्यता दिसून आली होती. परंतू वारंवार पराभूत उमेदवाराला ती देण्यात आली. ही जागा पक्षाने लढावी म्हणून नेत्यांनी पाठपुरावा केला. जागा पदरात पडणार असल्याचे सूचक संदेशपण मिळाले. मात्र घात झाला. आता अर्ज दाखल करणार. आघाडीच्या नेत्यांनी काहीही म्हटले तरी हटणार नाही. शेवटी पक्ष टिकविण्याचा हा लढा असल्याचे समीर देशमुख म्हणाले. उमेदवार जाहीर होताच आघाडीत विसंवाद असल्याचे चित्र पहिल्याच दिवशी उमटले आहे. मात्र यात तडजोड होण्याची पण शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होते.