अलिबाग- विधानपरिषद निवडणूकीत शेकाप सरचिटणीस जंयत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. २३ मतांचा अपेक्षित कोटा पूर्ण न करता आल्याने त्यांचा पराभव झाला. मित्र पक्षांची मतेही त्यांना मिळू शकली नाही. त्यांच्या पराभवामुळे शेकापची आगामी वाटचाल अधिकच खडतर होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयंत पाटील हे चार वेळा विधान परिषदेवर निवडून आले होते. दोन वेळा निवडणूक होऊन तर दोन वेळा बिनविरोध त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली होती. २४ वर्ष त्यांनी विधिमंडळाच्या वरिष्ट सभागृहाचे प्रतिनिधीत्व केले होते. पुन्हा पाचव्यांदा विधान परिषदेवर जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाची अपेक्षित साथ त्यांना मिळाली नाही. इतर छोट्या सहकारी पक्षांची अपेक्षित मते त्यांना मिळाली नाही. २३ मतांची गरज असताना पाटील यांची गाडी १२च्या पुढे गेली नाही.

हेही वाचा : ना किमान समान कार्यक्रम ना समन्वयक! आताची एनडीए वाजपेयींच्या काळापेक्षा वेगळी कशी?

उध्दव ठाकरेंची नाराजी त्यांना भोवल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत शेकापने रायगड आणि मावळ मध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवारांना पाठींबा दिला होता. मात्र शेकापचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार पिछाडीवर राहीले होते. शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या अलिबाग आणि पेण सारख्या विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांना चाळीस हजाराहून अधिकचे मताधिक्य मिळाले होते. तेव्हा पासून शेकापने लोकसभा निवडणूकीत शिवसेने अनंत गीतेंना अपेक्षित मदत केली नसल्याचे आरोप होऊ लागले होते.

लोकसभा निवडणूकीनंतर कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणूकीत काँग्रेसचे रमेश कीर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यानंतर सर्वाधिक मतदार हे रायगड जिल्ह्यातील होते. त्यामुळे शेकापकडून चांगल्या सहकार्याची अपेक्षा काँग्रेसला होती. मात्र तसे झाले नाही. काँग्रेसच्या रमेश कीर यांचा निवडणूकीत दारूण पराभव झाला. भाजपचे निरंजन डावखरे विजयी झाले. यामुळे काँग्रेस पक्षही नाराज होता. अशातच विधानपरिषद निवडणुकीच्या आदल्या दिवशी त्यांनी काँग्रेसची मते फुटतील अशी प्रतिक्रीया त्यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलतांना व्यक्त केली होती.

हेही वाचा : पाच वर्षे काँग्रेसमध्ये फूट पडली नसली तरी विधान परिषदेत मते फुटली

त्यामुळे विधानपरिषद निवडणूकीआधीच महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट जयंत नाराज असल्याचे दिसून येत होते. या नाराजीतूनच उध्दव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना निवडणूकीत उतरवले असल्याची चर्चा होती. आणि काँग्रेसनी जास्तीची मते नार्वेकरांना देण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची १२ आणि एमआयएम, समाजवादी पार्टी, शेकाप आणि हीतेंद्र ठाकूर यांच्या मतांवर जयंत पाटील यांची भिस्त होती. मात्र १२ मतें त्यांना मिळाल्याने अन्य पक्षांची मते त्यांना मिळाली नसावीत असे दिसून येत आहे.

हेही वाचा : भाजपमधील वादाला शिंदेगटाची फोडणी?

शेकापसाठी जयंत पाटील यांचा हा पराभव जिव्हारी लागणारा आहे. कारण ते नुसते आमदार नव्हते तर पक्षाचे सरचिटणीसही आहेत. या पराभवामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची होण्याची शक्यता आहे. जयंत पाटील हे विधान परिषदेतील सर्वात जेष्ठ नेते म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे सर्व पक्षीय नेत्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदरभाव होता. त्यांचे सर्वांशी सलोख्याचे संबधही होते. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत पक्षाच्या आमदारांचे पाठबळ नसताना त्यांनी आपले विधानपरिषदेतील स्थान २४ वर्ष कायम राखले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shetkari kamgar paksh jayant patil lost mlc polls print politics news css
Show comments