अलिबाग : महाविकास आघाडीतील समावेशाबाबत ‘शेतकरी कामगार पक्ष’ (शेकाप) अजूनही आशावादी आहे. ‘शरद पवार यांनी आपल्याला शब्द दिला आहे. ते यातून नक्कीच मार्ग काढतील,’ असा विश्वास शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी अलिबाग येथे व्यक्त केला. यावेळी रायगडमधील चार उमेदवारांसह सांगोल्यातूनही शेकाप उमेदवारांची घोषणा त्यांनी केली.
हेही वाचा >>> Maharashtra Assembly Election 2024 : मराठवाड्यात जातनिहाय याद्यांचा सर्वपक्षीय खटाटोप
शेकापतर्फे अलिबागमधून चित्रलेखा पाटील, पेणमधून अतुल म्हात्रे, उरणमधून प्रितम म्हात्रे तर पनवेलमधून बाळाराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सांगोल्यातून गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी देत असल्याचे जाहीर करण्यात आले. ग्रामीण भागात पक्षाची ताकद आणि जनाधार आजही कायम आहे. त्यामुळे निवडणुकीत पक्षाचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल आणि उरण या चार जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून ‘शेकाप’साठी सोडल्या जाव्यात अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र उरणमधून मनोहर भोईर यांना शिवसेना ठाकरे गटाने परस्पर उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. सांगोल्यातूनही दीपक साळुंखे यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याचे संकेत दिले. त्यामुळे ‘शेकाप’ची कोंडी झाली होती. शिवसेना ठाकरे गटाबरोबरच काँग्रेसकडूनही ‘शेकाप’ला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे महाविकास आघाडीतील शेकापच्या समावेशाबाबत संभ्रम निर्माण झाला होता.