अलिबाग– शेकापचे जिल्हा चिटणीस पद समर्थपणे संभाळणाऱ्या आस्वाद पाटील यांनी आपल्या पदासह पक्षसदस्यत्वाचाही राजीनामा दिला. पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. आस्वाद पाटील यांच्या नंतर त्यांच्या समर्थकही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पक्षाच्या अडचणीत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे.
आस्वाद पाटील हे माजी आमदार मिनाक्षी पाटील यांचे चिरंजीव आहेत. त्याच बरोबर शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत. गेली अनेक वर्ष जिल्हा चिटणीस पदावर ते कार्यरत होते. त्यामुळे जिल्ह्यातील पक्षाच्या राजकारणावर त्यांची घट्ट पकड होती. या शिवाय जिल्हा परिषदेत प्रदिर्घ काळ काम करण्याचा अनुभव असल्याने, जिल्ह्यातील राजकारणाची नस त्यांना अचूक माहित होती. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद, अर्थ व बांधकाम सभापती पद, याशिवाय गटनेते पदही त्यांनी भूषविले होते. जिल्ह्याच्या आणि राज्याच्या कबड्डी संघटनेची धुरा त्यांनी संभाळली होती.
हेही वाचा >>>पालिका निवडणुका एप्रिलनंतर, २२ जानेवारीला सुनावणीवर भवितव्य
पाटील कुटुंबातील वाद आणि पक्षांतर्गत एकाधिकारशाही या कारणामुळे त्यांनी पक्ष त्याग केला आहे. विधानसभा निवडणूकीत आस्वाद पाटील अलिबाग मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. माजी आमदार सुभाष पाटील यांना उमेदवारी देणार नसाल तर आपल्याला उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र ज्येष्ठता डावलून, शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी त्यांची सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली. यामुळे पाटील कुटूंबातील नाराजी होती. निवडणूक प्रचारापासून सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील हे अलिप्त राहिले होते. त्याचा परिणाम निवडणूक निकालावर दिसून आला. जनाधार असलेले दोन्ही नेते निवडणुकीपासून दूर राहील्याने, चित्रलेखा पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. शेकापने अलिबागच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत जुळवून घेण्याचे धोरण स्विकारले. मात्र पेण, पनवेल आणि उरण मध्ये त्यांनी शिवसेनेशी जुळवून घेण्याची भूमिका घेतली नाही. कर्जत मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठींबा देण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठींबा दिला. यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. या सर्वाचा परिणाम निवडणूक निकालांवर झाला. जिल्ह्यातून पक्षाचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही.
हेही वाचा >>>Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
पंढरपूर इथे ऑगस्ट महिन्यात झालेल्या शेकापच्या अधिवेशना दरम्यान पहिल्यांदा पाटील कुटूंबातील वाद समोर आले होते. माजी आमदार सुभाष पाटील यांनी जयंत पाटील यांना मनमानी पध्दतीने चिटणीस मंडळाच्या नियुक्त्या तुम्ही करू शकत नाही असे म्हणत सुनावले होते. यामुळे पाटील कुटूंबात वादाची पहिली ठिणगी पडली होती. अलिबागची उमेदवारी नाकारल्याने कुटुंबातील संबंध अधिकच ताणले गेले. अशातच आस्वाद पाटील यांची जिल्हा चिटणीस म्हणून अलिबाग येथील शेतकरी भवन मध्ये असलेली केबीन काढून घेतली गेली. यामुळे नाराजी अधिकच वाढली. या नाराजीतूनच त्यांनी पक्षत्याग करण्याचा निर्णय घेतला. आस्वाद पाटील यांच्यासोबत पक्षाचे अनेक पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पक्षाचे भवितव्य अडचणीत येण्याची शक्यता आहे.