मोहन अटाळकर
अमरावती : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरील संत गाडगेबाबांच्या दशसूत्री विचारांचा फलक हटविण्यात आल्यानंतर राज्यभरातून उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलक पुन्हा लावण्यात येईल, अशी घोषणा केली खरी, पण तो सरकारने नव्हे, तर एका कार्यकर्त्याने काल स्वखर्चाने लावल्याने या विषयावरील सरकारी अनास्था उघड झाली आहे.राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष चेतन शिंदे यांनी सोमवारी थेट मंत्रालयात शिडी आणि फलक लावण्याचे साहित्य घेऊन प्रवेश केला. त्यांनी स्वत: आणलेला फलक प्रवेशद्वाराजवळील खांबावर लावला. त्यावेळी कुणीही सत्ताधारी नेता हजर नव्हता. चेतन शिंदे यांनी समाज माध्यमाद्वारे ही माहिती सर्वांना दिली. फलक पुन्हा लावला गेला, पण सरकारी पातळीवर सन्मानासह दशसूत्री फलकाची पुनर्स्थापना होईल, ही अपेक्षा फोल ठरली.
‘शाळेहून नाही! थोर ते मंदिर !! तीर्थी धोंडापाणी! देव रोकडा सज्जनी’ अशा साध्या सरळ, सोप्या भाषेत, कीर्तनातून साऱ्या जगाला विज्ञानवादाचा संदेश देणारे, समाजसुधारक संत गाडगेबाबा यांचे दशसूत्री विचार मांडणारा फलक १२ मार्च २०२० रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला होता. दशसूत्री विचार मंत्रालयात काम करणाऱ्या साध्या शिपायापासून ते मंत्र्यांना, कामानिमित्त येणाऱ्या लोकांना प्रेरणा देत राहील. सरकारचे कामकाज नि:स्वार्थीपणे भ्रष्टाचारविरहीत चालावे हा त्यामागील हेतू असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.
पण, गेल्या आठवड्यात हा फलक हटविण्यात आल्याने राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विविध संघटनांनी सरकारचा निषेध नोंदवला. चेतन शिंदे यांनी सरकारने आठ दिवसांत या फलकाची पुनर्स्थापना न केल्यास आपण स्वत: सन्मानाने फलक लावणार, असा इशारा २७ सप्टेंबरला दिला होता. ही मुदत संपताच सोमवारी चेतन शिंदे यांनी स्वखर्चाने फलक तयार करून त्या ठिकाणी लावला. मंत्रालयातील अधिकारी आणि मित्रांच्या सहकार्याने आपण हा फलक लावल्याचे चेतन शिंदे यांनी सांगितले आहे. पण, या घडमोडींची गंधवार्ताही सत्ताधारी नेत्यांना असू नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा : लातूर लोकसभेसाठी पुन्हा ‘रेल्वे येईल धावुनी…’चा राजकीय खेळ
महाविकास आघाडी सरकारच्या काळात लावण्यात आलेल्या या फलकावर उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी होती. ‘हा फलक काढण्यात आलेला नाही. फलकावर रेघोट्या उमटल्या होत्या. विद्रुप दिसत असल्याने तो काढण्यात आला. नव्याने तयार करून तो फलक दोन दिवसांत लावण्यात येईल’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ ऑक्टोबर रोजी वर्धा येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. पण, फलकाची सन्मानासह पुनर्स्थापना होऊ शकली नाही. संत गाडगेबाबांच्या शिकवणीनुसार आमचे शासन काम करणार आहे, हे वाक्य नवीन फलकावर नाही. फलकावर शेवटी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य असा उल्लेख आहे. चेतन शिंदे यांना हा फलक लावण्याची परवानगी सरकारने दिली होती का, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.
संत गाडगेबाबांच्या दशसूत्री फलकाची पुनर्स्थापना झाली, पण यावेळी एकही सत्ताधारी नेता हजर नव्हता, याचे आश्चर्य वाटते. गाडगेबाबांची शिकवण ही सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. फलक हटविण्यात आल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या. हा फलक सरकारी पातळीवर सन्मानाने लावला जावा, अशी अपेक्षा होती. ती पूर्ण होऊ शकली नाही, असे मत सामाजिक कार्यकर्ते संतोष अरसोड यांनी व्यक्त केली आहे.