अनिकेत साठे, लोकसत्ता
नाशिक – शिवसेना ठाकरे गटातील स्थानिक काही कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ठाकरे गटातील बडे नेते भाजप प्रवेशाच्या प्रतिक्षेत असून योग्य वेळी त्यांचाही प्रवेश होणार असल्याचा दावा भाजपचे स्थानिक पदाधिकारी करीत आहेत. त्यामुळे ठाकरे गटातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याच्या स्पर्धेत शिवसेना शिंदे गटापाठोपाठ आता भाजपही उतरल्याचे दिसत आहे. ठाकरे गटातील अनेक प्रमुख मंडळी, माजी नगरसेवक आधीच शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे ठाकरे गटात आता विशेष काही राहिले नसल्याचा शिंदे गटाचा दावा आहे.
श्रीराम भूमीचा संदर्भ देत नववर्षात २३ जानेवारी रोजी शिवसेना ठाकरे गटाने नाशिकमधून आगामी निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्याचे जाहीर केल्यानंतर शिंदे गट, भाजपकडून त्यांना प्रतिशह देण्याचे डावपेच आखले जाऊ लागले आहेत. मुंबई येथील प्रदेश कार्यकारिणी बैठकीत काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या प्रवेशाला भाजपने थेट ठाकरे गटाला खिंडार पडल्याचे स्वरुप देणे, हा त्याचाच एक भाग. नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे, भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या पुढाकारातून हा प्रवेश सोहळा घडवून आणला गेल्याचे सांगितले जाते. शिवसेना दुभंगल्यापासून स्थानिक पातळीवर पक्षांतराचे वारे वाहत आहेत. शिंदे गटाने ठाकरे गटाला नामोहरम करण्याची एकही संधी सोडलेली नाही. नाशिक शिवसेनेवर खासदार संजय राऊत यांचा पूर्वापार प्रभाव आहे. पडझड रोखण्यासाठी त्यांनी बरीच धडपड केली. मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. उलट त्यांच्या नाशिकवारीच्या मुहूर्तावर ठाकरे गटाला सुरुंग लावण्याचे नियोजन शिंदे गटाने वेळोवेळी यशस्वी करून दाखवले.
आणखी वाचा-विकसित भारत संकल्प यात्रेवरून सिंधुदुर्गात वातावरण तापले
राऊत ज्या दिवशी नाशिकमध्ये दाखल होत, त्याच दिवशी ठाकरे गटाचे नेते, पदाधिकाऱ्यांना शिवसेना शिंदे गटात आणून राऊतांना धक्के दिले जात. सलग काही महिने चाललेला खेळ अलिकडेच थांबला. एक, दोन वेळा राऊत नाशिकला येऊनही कुणी शिंदे गटात गेले नाही. ती कसर बहुधा भाजप भरून काढण्याच्या तयारीत आहे. आजवर पक्षांतरावेळी केवळ शिवसेनेचा (शिंदे गट) विचार करणारे ठाकरे गटाचे पदाधिकारी भाजपचा पर्यायही चाचपडत आहेत. त्यामुळे पुढील काळात ठाकरे गटातून आणखी काही प्रमुख नेते भाजपमध्ये सहभागी होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
स्थानिक पातळीवर घाऊक पक्षांतर घडवण्यात भाजपइतका कुणालाही अनुभव नाही. गेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षाने सर्वांसाठी पक्षाचे दरवाजे खुले केले होते. निष्ठावान कार्यकर्त्यांची नाराजी पत्करून मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकांना पक्षात सामावून घेतले होते. महापालिकेत सत्तेवर असणाऱ्या मनसेची अखेरच्या टप्प्यात पक्षांतराने पुरती वाताहत झाली होती. शिवसेनेची दोन गटात विभागणी झाल्यानंतर आजवर अनेकांनी शिंदे गटाला जवळ केले. महापालिकेत शिवसेनेचे ३५ नगरसेवक होते. यातील तीन जणांचा मृत्यू झाला. ३२ पैकी १३ माजी नगरसेवक आणि अनेक प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात गेले आहेत. उर्वरित माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांवर भाजप नजर ठेऊन आहे. शिंदे गटात जाण्याचा ओघ ओसरल्यानंतर भाजपने उर्वरितांना आपल्याकडे खेचण्याची तयारी केल्याचे अधोरेखीत होत आहे.
आतापर्यंत शिवसेनेतील ३२ पैकी १३ माजी नगरसेवक व संघटनेतील सर्व प्रमुख कार्यकर्ते आमच्याकडे आले आहेत. ठाकरे गटात केवळ बोटावर मोजता येतील इतकी नेतेमंडळी आहेत. त्यांच्यातील अनेक जण कुठल्याही क्षणी शिवसेनेत (शिंदे गट) येऊ शकतात. ठाकरे गटाला खिंडार पाडण्यासारखी स्थिती राहिलेली नाही. कारण, बहुतांश पदाधिकारी आधीच आलेले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी आणखी काही महत्वाचे प्रवेश होतील. -अजय बोरस्ते (जिल्हाप्रमुख, शिवसेना, शिंदे गट)
शिवसेनेतील बडे नेते भाजपमध्ये प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. योग्य वेळी त्यांचा पक्षात प्रवेश होईल. विकास कामांमुळे असंख्य कार्यकर्त्यांना एक विश्वास निर्माण झाला आहे की. भाजपच देशाला प्रगतीच्या मार्गावर नेणार आहे. त्यामुळे विविध पक्षातून भाजपमध्ये प्रवेश होत आहेत. -प्रशांत जाधव (शहराध्यक्ष, भाजप)