संजय मोहिते
बुलढाणा : शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यावर या गटाचे काय होणार, कोणत्या पक्षात विलीन होणार की भाजपमध्ये जाणार याबाबत पहिल्या दिवसापासून तर्कवितर्क लावणे सुरू असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या बुलढाणा दौऱ्यात बुलढाण्याचा भावी खासदार व जिल्ह्यातील सर्व आमदार ‘कमळा’चाच असेल असे ठासून सांगितल्याने शिंदे गटासोबत गेलेले सेनेचे खासदार प्रतापराव जाधव व सेनेचे अन्य दोन आमदार हे पुढील निवडणूक कमळावर लढणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा अनेक कारणांनी गाजला. त्यांच्या दौऱ्यामुळे भाजपमध्ये उत्साह संचारला असला तरी शिंदे गटात मात्र अस्वस्थता आहे. शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर जिल्ह्यातील सेनेचे खासदार प्रतापराव जाधव आणि दोन आमदारांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. भाजपनेही पुढील निवडणूक शिंदे गट-भाजप युती एकत्र लढणार अशी घोषणा केली. मात्र भाजप प्रदेशाध्यक्षांनी बुलढाण्यात वेगळा सूर लावल्याने शिंदे गटात अस्वस्थता आहे. बुलढाण्याचा भावी खासदार ‘कमळा’चाच असेल, एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील सातही आमदार भाजपचेच, जिल्हा परिषदमध्ये भाजपचेच बहुमत राहणार अन् ९० टक्के पालिकाध्यक्ष आमचेच राहणार, असे बावनकुळे म्हणाले. सर्वच ठिकाणी भाजप असेल तर शिंदे गटातील विद्यमान खासदार -आमदारांचे काय? ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असे तर बावनकुळे यांना सांगायचे नव्हते ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
हेही वाचा… मिरजेत शिवसेना फुटीतील वाद गणेशोत्सवाच्या स्वागत कमानीपर्यंत
शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाचा निर्णय विरोधात गेला व अपात्रतेची कारवाई टाळायची असेल तर शिंदे गटाला इतर पक्षात विलीन व्हावे लागेल. ही शक्यता गृहीत धरूनच भाजप प्रदेशाध्यक्षांनी वरील संकेत दिले असावे, असेही बोलले जात आहे.
प्रदेशाध्यक्षांची ‘फोडा आणि जोडा’ नीती
फडणवीस-शिंदे मिळून ५० आमदार फोडून सरकार स्थापतात. त्यांचा कित्ता गिरवत कार्यकर्त्यांनी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीचे किमान ५० कार्यकर्ते फोडावे, असा आदेशच बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला.