हर्षद कशाळकर
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील २४० ग्रामपंचायतीसाठी येत्या रविवारी निवडणूक होत असली तरी यातील ५० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ५० पैकी तब्बल ३८ ग्रामपंचायती जिंकून शिवसेनेच्या शिंदे गटाने वरचष्मा राखला आहे. यातील ३२ ग्रांमपंचायती या एकट्या महाड विधानसभा मतदार संघातील आहेत.
२४० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ८८० अर्ज प्राप्त झाले होते. यातील ११ जणांचे अर्ज छाननी दरम्यान अवैध ठरले. त्यामुळे ८६९ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहीले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंच पदाच्या ३३८ उमेदवावांनी माघार घेतली. त्यामुळे आता ५३१ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूकीत शिल्लक राहीले आहेत. तर २४० ग्रामपंचायतीच्या १ हजार ९४० जागांसाठी ४ हजार ३८० अर्ज प्राप्त झाले होते. यातील ५१ अर्ज छाननीत अवैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या १ हजार ०९१ जणांनी माघार घेतली. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूकीत ३ हजार २३८ उमेदवार शिल्लक राहीले आहेत. उर्वरीत ग्रामपंचायतीसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
हेही वाचा… गुजरातमधील भाजपच्या यशात मराठी नेत्याची भूमिका महत्त्वाची
उमेदवारांनी माघार घेतल्याने रायगड जिल्ह्यातील एकूण ५० ग्रामपंचायतींची बिनविरोध झाली आहे. महाड तालुक्यात सर्वाधिक २२ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्याखालोखाल पोलादपूर तालुक्यात ९ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. याशिवाय मुरूड तालुक्यातील १, पेण २, उरण १, खालापूर १, माणगाव ३, श्रीवर्धन ४, म्हसळा ७ ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाल्या. यातील ३८ ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचा वरचष्मा राहील्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा… मोदींकडून शिंदे, फडणवीस यांच्यावर स्तुस्तीसुमने आणि गडकरींचा सहभाग शिष्टाचारापुरता
सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामपंचायत निवडणूकींना गांभिर्याने घेतले आहे. आपआपल्या मतदारसंघातील वर्चस्व कायम राहावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गरज भासल्यास सोयीस्कर युती आघाडीवर राजकीय पक्षांनी भर दिला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांची ही रंगीत तालिम असल्याने प्रस्तापित पक्ष आपआपले गड राखणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा… खडसेंच्याविरोधात उत्पादकांचा कौल; जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक निकाल
महाड विधानसभा मतदारसंघातील ३२ ग्रामपंचायती आम्ही बिनविरोध निवडून आणल्या आहेत. यावरून पक्षाला असलेला जनाधार स्पष्ट होतो. मतदारसंघातील उर्वरीत ग्रामपंचायती निवडून आणण्याची आमची ताकद आहे. निवडणूकीच्या निकालानंतर ते स्पष्ट होईल. – भरत गोगावले, आमदार, शिंदे गट