छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातील शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या वादात आता समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी उडी घेतली. अंबादास दानवे यांच्यावर टीका करणाऱ्या चंद्रकांत खैरे यांची भूमिका बरोबर असून दानवे जेव्हापासून जिल्हाप्रमुख झाले तेव्हापासून शिवसेना घसरणीलाच लागली.
विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या व्यक्ती पक्षात टिकून राहणार नाहीत अशांना उमदेवारी देण्यात अंबादास दानवे यांनी पुढाकार घेतला होताच. ही खैरे यांची भूमिका योग्य होती. त्यांना शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारायचे असेल तर त्यांना दारे उघडी आहेत, अशी भूमिका संजय शिरसाट यांनी मांडली.
विधानसभा निवडणुकीमध्ये संजय शिरसाट यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे राजू शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्ष सोडताना त्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली. अंबादास दानवे यांनी उमेदवारी मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
राजू शिंदे हे पूर्वी भाजचे कार्यकर्ते होते. मात्र, युतीमध्ये औरंगाबाद पश्चिम हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने त्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश करुन उमदेवारी मिळवली होती. निवडणुकीमध्ये त्यांचा संजय शिरसाट यांनी पराभव केला. मात्र, आता राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यापूर्वी राजू वैद्य यांनीही राजीनामा दिला.
यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गळती लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
अशा संघटनात्मक वातावरणात चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर टीका केली होती. विधानसभा निवडणुकीमध्ये बाहेरुन आलेल्या उमेदारी देण्यात अंबादास दानवे यांनी महत्त्वाची भूमिका वठवली होती, असा अरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्याची मंत्री संजय शिरसाट यांनी आज पाठराखण केली.
निवडणुकीच्या कालावधीमध्ये राजू शिंदे यांना उमेदवारी मिळू नये असे चंद्रकांत खैरे यांचे मत होते. त्यामुळे त्यांनी औरंगाबाद पश्चिममध्ये प्रचार केला नव्हता, अशी चर्चा होती. त्याला उत्तर देताना शिरसाट म्हणाले, त्यांनी मला मदत केली असेल तर त्यांचे आभार.’ जर त्यांना पक्ष बदलून इकडे यायचे असेल तर त्यांच्यासाठी पक्षाचे दारे उघडी असल्याचेही शिरसाट म्हणाले.
‘मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहीन. मला काही मिळो की न मिळो, मी बाळासाहेबांना शब्द दिला होता. त्यामुळे आता पक्षांतर कधीच करणार नाही. ’