कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी वेळी १४ व्या फेरीपर्यंत ठाकरे सेनेचे  माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांची आघाडी होती. पुढच्या दहा फेऱ्यांमध्ये शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी आघाडी घेत दुसऱ्यांदा संसद गाठण्याची किमया केली. अर्थात याचे खरे किमयागार ठरले ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे! तर, मविआचा हातातोंडाशी आलेला यशाचा घास निघून जाण्यास जयंत पाटील यांचा आळस नडल्याची मतदारसंघात चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हातकणंगलेत धैर्यशील माने यांच्या विषयी नाराजी असल्याचा मुद्दा भाजपने सर्व्हेच्या आधारे उपस्थित केला. शिवाय, हा मतदार संघ पक्षाला मिळावा अशी मागणी रेटली होती. पुढे, इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली तर शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ही नाराजी हेरून बंधू संजय पाटील यड्रावकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे प्रयत्न केले. पन्हाळ्याच्या आमदार विनय कोरे यांचीही नाराजी होती.

हेही वाचा >>>अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश हाच पराभवाचा कळीचा मुद्दा; पराभूत उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचे मत

सब कुछ एकनाथ शिंदे

एकूणच सारे वातावरण लक्षात आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली. आठ – दहा फेऱ्या मारत त्यांनी परिस्थिती सुधारण्याची आवश्यक ती सारी पावले टाकली. साम-दाम-दंड-भेद ही चाणक्य नीति मुख्यमंत्र्यांनी शब्दशः अमलात आणली. कोल्हापूर – हातकणंगलेतून यशासाठी आवश्यक ते घडणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी ठाण्याची स्वतंत्र यंत्रणा येथे कार्यरत केली. प्रत्येक मत महत्त्वाचे समजून ते मिळवण्यासाठी जे करावे लागेल ते करण्यासाठी या यंत्रणेला या कामाला जुंपले. ही यंत्रणाही मग अर्थपूर्ण काम चोखपणे करत राहिली. रात्री अकरा वाजता आमदार कोरे यांचे भेट तर पहाटे आमदार यड्रावकर यांची भेट घेऊन आवश्यक ती सारी रसद पुरवली. आमदार आवाडे यांच्या घरी जाऊन नाराजी दूर त्यांनाही सक्रिय केले. उमेदवारी जाहीर होऊन १५ दिवस झाले तरी मरगळलेली प्रचार यंत्रणा मग मुख्यमंत्र्यांचे पौष्टीक टॉनिक मिळाल्यानंतर भलतीच जोमात आली. इचलकरंजीत माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह भाजपची यंत्रणा कार्यरत झाली. येथे आजी-माजी आमदारांच्या प्रयत्नामुळेच माने यांना येथे सर्वाधिक ४० हजाराचे मताधिक्य मिळाले. किंबहुना तेच विजयास कारणीभूत ठरले.

हेही वाचा >>>पंतप्रधान मोदींचे विश्वासू सहकारी प्रधान सचिव पदावर कायम; कोण आहेत पी. के. मिश्रा?

दुसरीकडे, महाविकास आघाडीने १५ दिवसातच केलेला प्रचार उल्लेखनीय ठरला ताकद मर्यादित असल्याचा मुख्यत्वे करून फटका बसला. सत्ताधाऱ्याप्रमाणे घरोघरी लक्ष्मीदर्शनाचे प्रयोग ते करू शकले नाहीत. सरूडकर यांच्या प्रचाराचे पालकत्व घेवू शकेल अशा प्रमुख नेतृत्वाचा निखळ अभाव होता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर धुरा होती. ते राज्याभर प्रचार करीत राहिले. त्यांचे जुने संबंध कामी आल्याचे एकंदरीत मताधिक्यावरून दिसत आहे. इस्लामपूर मतदारसंघात आणखी मोठ्या मताधिक्याची   अपेक्षा फोल ठरली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांचेही या भागात प्रयत्न अपुरे राहिले. दुसऱ्या फळीने जोमाने केलेला प्रचार सारुडकर यांना विजयाच्या फज्ज्यापर्यंत आणणारा होता. पण यश मात्र दुरावलेते दुरावलेच.

शेट्टी शिवारातच!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्वबळावर लढण्याची भूमिका आत्मघातकी ठरली. दोन वेळा खासदार झालेल्या शेट्टी यांची अनामत रक्कम जप्त झाली यातच त्यांचा  निर्णय कितपत फलदायी ठरला हेच अधोरेखित होते. एकला चलो रे करीत चाललेल्या शेट्टींना मिळालेली १ लाख ८० हजाराची मते उल्लेखनीय असल्याने त्यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असणार याची उत्सुकता राहिली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group mp darhysheel mane is leading in the counting of votes in hatkanangale lok sabha elections print politics news amy