ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांचा प्रभाव राहीलेल्या ठाणे जिल्ह्यातील काही प्रतिष्ठेच्या मतदारसंघात प्रयत्न करूनही बंडखोरी रोखण्यात शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आलेले नाही. नवी मुंबईतील ऐरोली-बेलापूर तसेच कल्याण पूर्व या तीन मतदारसंघांत शिंदे यांच्या पक्षाचे तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भाजपचे माजी खासदार कपील पाटील यांच्या काही कट्टर समर्थकांनी बंडखोरी केल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. कल्याण पश्चिमेत माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या माघारीसाठी शिंदे-फडणवीस यांनी केलेले प्रयत्न मात्र यशस्वी ठरले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे हा मुख्यमंत्र्यांचा गृहजिल्हा असल्याने येथे बंडखोरी होऊ द्यायची नाही असा स्वत: शिंदे यांचा प्रयत्न होता. दिवाळी काळातच त्यांनी केवळ बंडखोर उमेदवार नव्हे तर वेगवेगळ्या मतदारसंघातील प्रभावी पदाधिकारी, नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली होती. इतके प्रयत्न करूनही जिल्ह्यातील बंडखोरी रोखण्यात शिंदे यांच्यासह फडणवीसांचे प्रयत्नही पुर्णपणे फळास आलेले नाहीत.

हेही वाचा >>>माघारनाट्य मविआच्या पथ्यावर? मनोज जरांगे यांच्या प्रभावाचा मराठवाड्यासह राज्यात फायदा होण्याची शक्यता

कोणाची बंडखोरी?

● नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे गणेश नाईक यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे विजय चौगुले अपक्ष म्हणून रिंगणात राहीले आहेत. त्यांनी अपक्ष अर्ज भरत नाईक यांना आव्हान दिले आहे.

● बेलापूर मतदारसंघातही भाजपच्या विद्यामान आमदार मंदा मात्रे यांना शिंदे गटाचे विजय नहाटा यांचा सामना करावा लागणार आहे.

● कल्याण पूर्वेत विद्यामान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपने उमेदवारी दिली खरी मात्र शिवसेनेच्या महेश गायकवाड यांनी येथून बंडखोरी करत आपला अर्ज कायम ठेवला आहे.

● भिवंडी ग्रामीण आणि कल्याण पश्चिम या मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या विद्यामान आमदारांना भाजपचे मोठे आव्हान आहे. भिवंडी ग्रामीणमध्ये शांताराम मोरे यांच्यासमोर कपिल पाटील समर्थक स्नेहा पाटील यांनी बंडखोरी केली आहे.

● कल्याण पश्चिम येथे शिवसेनेच्या विश्वनाथ भोईर यांच्यासमोर कपिल पाटील यांचे निकटवर्तीय वरुण पाटील यांनी बंडखोरी केली आहे.

● मीरा-भाईदर विधानसभा मतदारसंघात विद्यामान आमदार गीता जैन यांनी अपेक्षेनुसार बंडखोरी कायम ठेवली असून त्या सलग दुसऱ्यांदा भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात रिंगणात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group rebels are a big challenge to bjp in thane print politics news amy